विनायक जाधव : म्हसळा
संकटे आली की, चहुबाजूंनी आक्रमण करतात. महामारी, निसर्ग वादळ आणि पुन्हा महामारीचे थैमान चालू असताना म्हसळे तालुका बौद्ध समाजाचे धुरंधर नेते दिवंगत हरीचंद्र स. मोहीते साहेब आणि दिवंगत मोहनराव येलवे साहेब यांचे अनुक्रमे दिनांक ११ एप्रिल आणि दिनांक १५ एप्रिल, २०२१ रोजी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. पुर्वीचा जंजिरा विभाग म्हणजे सध्याचे म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड आणि नव्या ने आस्तित्वात आलेला तळा तालुका मिळून साडेतीन तालुक्याची गणना आज ही केली जाते. या साडेतीन तालुक्यात दिवंगत मोहीते साहेब आणि येलवे साहेब यांना मानाचे स्थान आहे.
रायगड जिल्हा, म्हसळा तालुक्यातील दुर्गम विभागात वसलेले बापट गावचे सुपुत्र दिवंगत मोहीते साहेब कला शाखेचे (बी.ए.)पदवीधर होते. तल्लख बुद्धी, उच्च शिक्षण या प्रमाणाच्या बळावर मुंबईतील सुप्रसिद्ध मे. इंडिया बुक हाऊस कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले. परंतु समाज सेवेसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने काही वर्षांनंतर नोकरीचा राजीनामा दिला. सतत हसतमुख, मधुरवाणी, लहान थोरांची आस्थेने विचारपूस करणे अशा सदगुणांमुळे विविध जातीधर्माच्या लोकांमध्ये मोहीते साहेबांना आदराचे स्थान होते. शांत, संयमी स्वभावाने विरोधकांना आपलेसे करण्यात साहेबांचा हातखंडा होता.
म्हसळा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेले मौजे सुरई गावचे सुपुत्र दिवंगत मोहनराव येलवे यांचे पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जकात विभागात निरीक्षक पदावर कार्यरत असताना सेवा निवृत्त झाले होते. शिस्तप्रिय, करारीबाणा, वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता यामुळे कार्यकर्ते येलवे साहेबांना वचकून वागायचे. परंतु येलवे साहेब खाजगीत प्रत्येकाची मायेने विचारपूस करायचे. केव्हा केव्हा एखाद्या गावठी म्हणीची आठवण करून विनोदी वातावरण निर्माण करायचे.
सुमारे १९८० च्या दशकात समाजसेवेच्या माध्यमातून नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावलेले मोहीते साहेब म्हसळे तालुका बौद्धजन समिती (मुंबई) या संस्थेच्या अध्यक्षपदी तर येलवे साहेब यांची सरचिटणीसपदी बहुमताने निवड झाली.
आपल्या अविरत समाजसेवेच्या माध्यमातून समाजबांधवांना संघटीत करुन प्रथम संस्था नोंदणीकृत केली. समाजाची हक्काची वास्तू म्हसळा तालुक्यात असावी या तळमळीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह उभारले. आरोग्य शिबीर, एस. एस. सी. व्याख्यान माला, धम्म प्रवचन असे लोकोपयोगी उपक्रम सुरू केले जे आज देखील अविरतपणे चालू आहेत.
या दोन्ही दिग्गज नेत्यांचे स्वभाव जरी जहाल - मवाळ असले तरी विचारात एकवाक्यता होती. दोघांची जिवलग मैत्री असल्याने वैचारिक घडी कधीही विस्कटली नाही.
जंजिरा विभागीय आंबेडकरी चळवळीच्या रथाची दोन्ही चाकं आजला निखळून पडली. दिवंगत मोहीते साहेब आणि दिवंगत येलवे साहेबांच्या जाण्याने रथ पोरका झाला आहे. खांद्यासाठी रथाची आर्त हाक टाहो फोडत आहे. दिवंगत साहेबांच्या मुशीतून तयार झालेले समितीचे कार्य कर्ते नक्कीच भार आपल्या खांद्यावर घेतील, हीच खरी श्रध्दांजली ठरेल.
Post a Comment