म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वर्गासह आरोग्य सेवा सुविधांची वानवा.




बाबू शिर्के :  म्हसळा 

तालुक्यातील गजबजलेल्या म्हसळा बाजारपेठेत ग्रामीण रुग्णालयाची 30 खाटांची क्षमता असलेली भव्य इमारत विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांचे विशेष प्रयत्नाने दोन कोटी रुपये खर्च करून सन 2014 मध्ये उभारण्यात आली.रुग्णालय कार्यान्वित होऊन 7 वर्षे झाली तरी येथे आवश्यक वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परीचारीका, आरोग्य कर्मचारी आणि यंत्र सामुग्रीची मोठी वाणवा आहे. म्हसळा ग्रामीण रुग्णालय अगदी एस.टी. स्थानकाला लागुनच असल्याने तालुक्यातील 80 गाववाडी वस्तीतील नागरिकांना आरोग्य सेवासुविधा घेण्यासाठी खुपच उपयुक्त आहे परंतु शासनाचे दुर्लक्षित पणामुळे सामन्य नागरिकांना म्हसळा ग्रामीण रुग्णालय आसुन नसल्यासारखे वाटत आहे. नाईलाजाने रुग्णाला खासगी दवाखान्यात जावे लागते आणि गरजु गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांनी या रुग्णालयात अनेक वेळा भेटी देऊन शासकीय अधिकारी वर्गाकडून समस्या निवारण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता परंतु त्यांची पाठ फिरली आणि काही कालावधी निघुन गेला की रुग्णालयातील कामकाज पुन्हा जैसे थे होतो.आजपर्यंतचा म्हसळा वाशियाना हा आलेला अनुभव आसुन येथे नियुक्ती करण्यात आलेला वैद्यकीय अधिकारी वर्ग अन्य दवाखान्यात काम करतो आणि पगार पावती म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे नावावर खपवली जाते यावर सातत्याने वरिष्ठ आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने म्हसळा तालुक्यातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याची खंत वाटते.पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काही महिन्यांपूर्वी स्थानिक असलेल्या डॉक्टर करंबे दांपत्याची बदलीवर नियुक्ती करून मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे येथील रोजची ओपीडी 50 ते 100 पर्यंत आहे. त्याच बरोबर काही प्रशिक्षित परिचारिकांची नेमणुक केल्याने डिलिव्हरी(बाळंतपण) संख्येत वाढ झाली आहे. हा होत असलेला उपचार फक्त प्राथमिक स्वरूपात आसुन अन्य क्रिटिकल सेवा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक,डॉक्टर आणि आवश्यक आरोग्य यंत्र सामुग्री उपलब्ध व कार्यान्वित नसल्याने मिळत नाहीत.ग्रामीण रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासुन डॉ.लोखंडे यांची म्हसळा ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे मात्र ते वैद्यकीय सेवा कुठे देत आहेत हे माहीत नाही परंतु त्यांचा मासिक पगार म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे नावाने मिळत असल्याचे समजते.म्हसळा ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन उपलब्ध आहे पण ती ऑपरेटर विना बंद आहे.येथे ईसीजी मशीन,डिप फ्रीज,रक्त चेक करण्यासाठी अत्याधुनिक मशीन, वॉशिंग मशीन,सोनोग्राफी आदी उपकरणाची नितांत गरज आहे.अत्यावश्यक वेळी रुग्ण वाहिका उपलब्ध होत नाहीत अशा अनेक समस्यानी म्हसळा ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवेविना आसुन नसल्यासारखे आहे. येथे आपत्कालीन वेळेत प्राथमिक उपचार होतो पण सर्दी खोकल्यावर असे नागरिक खासगीत चर्चा करताना दिसतात. आजची परिस्थिती लक्षात घेता तालुक्यात रोजच पाच सहा कोरोना बाधीत रुग्ण आढळतात मात्र येथे व्हेंटिलेटरच्या सुविधांचा अभाव आहे.म्हसळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकासह,एक वैद्यकीय अधिकारी, 5 परिचारिका, सफाई कामगार 2, औषध निर्माण अधिकारी 1, प्रयोगशाळा सहाय्यक 1, सुरक्षा रक्षक 1, कक्ष सेवक 3, दंत शल्य चिकित्सक 1आणि क्ष किरण तंत्रज्ञ 1 इतक्या जागा रिक्त आहेत.म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.ढवळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे परंतु त्यांना म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यास वेळच मिळत नसल्याने म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेवा दुर्लक्षित झाली आहे.म्हसळा तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्ण उपचारासाठी वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी नसल्याने श्रीवर्धन येथे दाखल करावे लागत आहेत.म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील गंभीर बाबीकडे जिल्हा वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी योग्य ती दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयात होत असलेली रुग्णांची हेळसांड वेळीच थांबवून आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात अशी मागणी तालुक्यातील सामान्य नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा