म्हसळा वार्ताहर :-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफच्या सुमार दर्जाच्या कामामुळे नागरिक आधीच हैराण झालेले असतानाच म्हसळा दिघी महामार्गाच्या दुतर्फा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहकार्याने विद्युत खांब उभे करून मृत्यूचा सापळा उभे करण्याचे काम सुरू असून नागरिकांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रस्त्याचे काम करताना मातीच्या भरावाचे काम योग्य पद्धतीने केलेले नाही त्यातच साईड पट्टी लगत योग्य ते अंतर न सोडता विजेचे खांब उभे केले आहेत.तसेच काही ठिकाणी उच्च दाबाची वीज वाहिनी रस्त्याच्या कडेने जमिनी खालून टाकण्याचे काम सुरू आहे याकडे एमएसआरडीसी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
शासन निर्णयानुसार कोणत्याही रस्त्याच्या दुतर्फा केबल,विद्युत खांब ,इंटरनेट केबल टाकायच्या असल्यास रस्त्याच्या साईड पट्टी पासून किमान 5 मीटर अंतर सोडणे अनिवार्य असताना सर्व नियम धाब्यावर बसवून रस्ते विकास महमंडळाने स्थानिक जनतेचा भकास करण्याचा विडा उचलला असल्याने स्थानिक जनता आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे.
म्हसळा गोंडघर पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करत असताना कोणत्याही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न करता योग्य त्या कागदपत्रां शिवाय शासकीय अधिकारी व ठेकेदार यांनी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनींवर महामार्गाचे काम केले आहे.त्यातच विद्युत खांब आणि इंटरनेट केबल टाकून एम एस आर डी सी ने नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नये.- ग्रामस्थ
Post a Comment