मानव एकता दिवस – बाबा गुरबचनसिंह यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
प्रसाद पारावे : मुंबई
“हृदयाची नाती जोडण्याचे नाव मानव एकता होय. परमात्म्याशी नाते जोडल्याने हे शक्य होते. परमात्म्याचा बोध होताच आपल्याला आपसूकच समजून येते, की आपण सर्व एक आहोत.” असे भावपूर्ण उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी आज व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आलेल्या मानव एकता समागमाला संबोधित करताना काढले.
संत निरंकारी मिशनचे पूर्व सद्गुरु बाबा गुरबचनसिंहजी, ज्यांना मानवतेचे मसीहा म्हटले जाते त्यांनी २४ एप्रिल, १९८० रोजी जगामध्ये मानव एकता, शांती, समता आणि बंधुत्वाची स्थापना करत असताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांच्या तपत्यागाने ओतप्रोत जीवनातून आणि महान शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या वतीने दरवर्षी २४ एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी व्हर्च्युअल रूपात आयोजित केलेल्या मानव एकता दिवस समागमाचा लाभ जगभर पसरलेल्या लाखोंच्या निरंकारी भक्तगणांनी मिशनच्या वेबसाईटच्या माध्यमातून प्राप्त केला.
सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी पुढे सांगितले, की आत्मा आणि परमात्म्याचे मिलन झाल्यानंतर मानवा-मानवामध्ये जात-पात किंवा उच्च-नीच असा कोणताही भेदभाव दिसत नाही. उलट प्रत्येकाची सेवा व मदत करण्याची भावना मनामध्ये उत्पन्न होते याचे व्यावहारिक रूप मागील एक वर्षांपासून पहायला मिळत आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात मिशनच्या अनुयायांनी वेगवेगळ्या रुपात सातत्याने मानवतेच्या सेवेमध्ये आपले योगदान दिले आहे.
बाबा गुरबचनसिंहजी यांनी एका बाजुला सत्याचा बोध प्रदान करुन मावी जीवन सर्वार्थाने भ्रमांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजुला नशाबंदी आणि साधे विवाह यांसारख्या सामाजिक सुधारणांचा पाया घातला. त्यांनी मिश्यानचा संदेश केवळ भारतातच नव्हे तर विदेशांमध्येही पोहचविला. परिणामी आज जगातील ६०हून अधिक देशांमध्ये मिशनच्या शेकडो शाखा स्थापन झाल्या असून त्या सत्य, प्रेम व मानवतेचा संदेश जनाजनापर्यंत पोहचवित आहेत. बाबा गुरबचनसिंहजी यांनी युवकांच्या ऊर्जेला नवा आयाम प्रदान करण्यासाठी त्यांना नेहमी खेळांकडे प्रेरित केले जेणेकरुन त्यांच्या ऊर्जेला उपयुक्त दिशा देऊन देश व समाजाची सुंदर निर्मिती करता येऊ शकेल.
मानवतेच्या निष्काम सेवांचे आणखी एक उदाहरण नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी समोर आले असून मिशनच्या बुराडी रोड, दिल्ली येथील ग्राउंड नं.८ वर असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनाचे दिल्ली सरकारच्या सहयोगाने १००० पेक्षा अधिक खाटांच्या कोविड ट्रीटमेंट सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले असून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसह हे सेंटर मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित करण्यात आले आहे.
याच नवनिर्मित कोविड ट्रीटमेंट सेंटरला सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी आज भेट दिली आणि त्याचे अवलोकन केले. याप्रसंगी सद्गुरु माताजींनी निराकार प्रभुकडे प्रार्थना केली, की याठिकाणी जे कोणी उपचार घेण्यासाठी येतील त्यांना स्वास्थ्य लाभ प्राप्त होवो. तसेच माताजींनी अशीही प्रार्थना केली, की जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर दूर होवो.
Post a Comment