धावीरदेव बाबा या कोरोना महामारी पासुन जगातील सर्वच मानव जातीचे रक्षण कर

शब्दांकन - प्रोफेसर श्री शिरीष समेळ सर
उद्या हनुमान जयंती म्हणजे आज रात्री म्हसळ्याचे ग्रामदैवत श्री. धावीर देवाची यात्रा ,श्री.धावीरदेव महाराजांची पालखी,त्यासाठी म्हसळा तालुक्यातील अनेक खेडेगावातुन देवाच्या काठ्या येणे  आणि आलेल्या काठ्या मंदिराच्या ओट्यावर  नाचवणे, त्या काठ्याचा आणि  त्याच्या सोबत आलेल्या ग्रामस्थांचा  मानपान करणे, त्यासाठी रात्रभराचे जागरण करणे त्यानंतर यावर्षी कोणत्या गावाची काठी  सर्वात मोठी  यावर  चर्चा करणे,  यात्रेतील दुकाने,भोग्याचा कर्कश पण त्या वातावरणात हवाहवासा  वाटणारा आवाज ,मुंबईतुन आलेले पाहुणे ,त्याच्याशी केलेला हितगुज , यात्रेतील दुकाने,यात्रा कर गोळा करण्यासाठी होणारी कार्यकर्त्याची धावपळ, बळी काढणा-या मानक-याची धावाधाव आणि नंतर ज्या क्षणाची सर्व म्हसळा ग्रामस्थ वर्षभर आतुरतेन वाट पाहत असतात तो क्षण म्हणजे श्री.धावीर देव महाराजाची पालखी देवळातुन बाहेर येणे आणि प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येकाच्या दाराजवळ पुजेसाठी घेऊन जाणे  आत्मीक,धार्मिक, सामाजिक आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे श्री.धावीर देव महाराजाच्या पालखी सोबत एक संपूर्ण रात्र आणि एक संपूर्ण दिवस अणवाणी राहणे जो कोणी म्हसळ्यात आला आणि त्याने त्याच्या वास्तव्यच्या काळात हा क्षण उपभोगला नाही त्याने आयुष्यातील खुपमोठी संधी वाया घालवली असे मला वाटते.

 अतिशय भावनिक वातावरणात ही पालखी गावात फिरते लोक धार्मिक भावनेतून नवस बोलतात आणि नवस फेडतात हा एक अतिशय भावनिक प्रसंग असतो त्याच बरोबर प्रत्येक घराच्या समोर पालखीची पुजा झाल्यानंतर मिळणारा प्रसाद ,आईस्क्रीम, सरबत याचा देखील आनंद अवर्णनीय असतो आणि सर्वात शेवटचे घरासमोर पालखीची पुजा झाल्यानंतर पालखी धावत देवळात घेऊन येणे आणि मंदिरा भोवती पालखीसह पाच प्रदक्षिणा घालुन पालखी देवळात आणणे,  श्री.धावीरदेव महाराजाचा जयघोष करणे परंतु हा सर्व भक्तीमय आनंद आणि श्री.धावीर देव महाराजांची सेवा करण्याच्या संधी म्हसळा ग्रामस्थानां सलग दुसऱ्या वर्षी देखील या कोरोना मुळे मिळणारनाही श्री. धावीरदेव बाबा या कोरोना महामारी पासुन जगातील सर्वच मानव जातीचे रक्षण कर आणि पुढच्या वर्षी तुझा मानपान करण्याची संधी आम्हा सर्व भक्तांना दे हेच तुझ्या चरणी मागणे.


शब्दांकन - प्रोफेसर श्री शिरीष समेळ सर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा