माणगाव मध्ये ट्रकला लागलेल्या भीषण आगीत चादरी आणि सतरंजी जळून खाक लाखोंचे नुकसान!!



किरण शिंदे / लोणेरे

माणगांव, दि. १८ मार्च माणगांव शहरातील दिघी पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खांदाड आदिवासी वाडी समोरील मोकळ्या जागेत नागपूरहुन सतरंजी चादर माल भरून आलेल्या ट्रक क्रमांक एम एच १२-एच डी ४४४८ ला अचानक आग लागल्याने माणगांव मध्ये एकच हल्लकल्लोळ माजला, नगर पंचायत कर्मचारी, नागरिक, प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी लाखोंच्या घरात हानी मात्र नक्कीच झाली आहे. मागील १५ दिवसातील शहरात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.

ही आग विझविण्यासाठी माणगांव नगर पंचायत कर्मचारी दशरथ गावडे, पोलीस हवालदार स्वप्नील कदम यांनी स्वतः हजर राहून तसेच चेतक इंटरप्रायजेस, जे एम म्हात्रे इन्फ्रा, फ्री बर्ड मोरबा, माधुरी वॉटर सप्लाय माणगांव, यांनी पाणी टँकर पाठवून आग आटोक्यात आणण्याचे काम केले. या घटनेची माहिती मिळताच माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगांव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे यांनी घटनास्थळी धाव घेतली

सदर लागलेली आग ही कशामुळे लागली हा चिंतेचा विषय आहे. मात्र घटनास्थळी ट्रक ज्या ठिकाणी जळत होता, त्या समोरून विद्युत वितरण कंपनीच्या फोर फेज लाईन चा झुला झाला आहे व त्या लाईनला ट्रकच्या हुडकरीता बांधण्यात आलेल्या रेगझिन चे तुकडे चिकटले आहेत. त्यामुळे ही आग मेन लाईन ला स्पार्क होऊन उडालेल्या ठिणगीमुळे ट्रक ने पेट घेतला असावा असे ट्रक चालकाचे म्हणणे आहे.

माणगांव ग्रामपंचायत ची नगर पंचायत होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आता निवडणूक देखील तोंडावर आहे. फायर ब्रिगेड साठी तरतूद देखील केली गेली आहे मंजुरी देखील मिळाली आता मात्र माणगांवकर प्रतीक्षेत आहेत की आपल्या शहरात अग्नीशमनदल केंव्हा दाखल होते, अशा परिस्थितीत महाड किंवा रोहा नगर परिषदे कडून बंब मागवला जातो मात्र तो इथपर्यंत पोहचायला एक तास लागत असल्याने कुठल्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा