राजकारणाचे बाळकडू, समाजकारणाची शिदोरी...या बळावर घेत आहेत आदिती तटकरे मोठी भरारी..



       महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि युवा नेतृत्वाची एक संपूर्ण फळीच राज्याला प्राप्त झाली. या महाविकास आघाडीचे शिल्पकार खा. शरदचंद्र पवार स्वतः देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून काम केलेले असल्याने तरुणांना प्राधान्य देण्याची त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. प्रत्येक विभागातून त्यानुसार योग्य उमेदवार निवडला जात असताना कोकण विभागातून कु.आदिती सुनिल तटकरे यांचं नाव पुढे येणं साहजिकच होतं. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होताच. लहानपणापासून वडिलांना राजकारण व समाजकारण करताना पाहणाऱ्या व कळत्या वयात आल्यावर अनेक कामांत त्यांना खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या कन्येला राजकारणाचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. कालांतराने भाऊ अनिकेत तटकरे यांनीही विधान परिषदेत आमदार म्हणून शपथ घेतली व मतदारसंघात कामांचा सपाटा लावला. तटकरे कुटुंबियांनी नेहमीच आपल्या मतदारसंघातील विकासकामांना राजकारणाच्या पलिकडे जाऊन प्राधान्य दिलं आहे. आदिती तटकरे याच मुशीत वाढल्याने लोकांच्या कामांना प्राधान्य देण्याची खुबी त्यांनी आपसूकच आत्मसात केलेली दिसते. 
      एम.ए.चं शिक्षण घेऊन काही काळ त्यांनी मुंबईच्या जयहिंद कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. २००८-०९ सालापासून त्या रायगडच्या स्थानिक राजकारणात सक्रीय झाल्या. २००९ साली श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात वडिलांच्या उमेदवारीचा प्रचार करण्यात त्या सक्रीय होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवारांना गुरुस्थानी मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१२ साली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी भरीव योगदान दिले. कोकण विभागाची  युवती संघटक या पदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी या भागात युवतींची संघटना वाढविण्याचे काम केले. दि.२३ फेब्रुवारी २०१७ रोजी वरसे, ता.रोहा या जिल्हा परिषद गटातून त्या रायगड जिल्हा परिषदेवर सदस्या म्हणून निवडून गेल्या. तर दि.२१ मार्च २०१७ रोजी ते २५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्यांनी रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्षा म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली. इथून प्रशासकीय कामांचा अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी थेट आमदारकीला गवसणी घातली. श्रीवर्धन मतदारसंघात खा. सुनिल तटकरे साहेबांनी आमदार असताना भरीव कार्य केले होते, त्यामुळे इथल्या नागरिकांची साथ व पाठिंबा नव्या ऊर्जेच्या नेतृत्वाला अर्थात युवा नेत्या आदिती तटकरे यांना लाभली. दि.२४ ऑक्टोबर, २०१९ रोजी १९३-श्रीवर्धन मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून तब्बल ४०,००० विक्रमी मताधिक्याने त्या निवडून आल्या.
     महाविकास आघाडीच्या युवा मंत्र्यांच्या फळीत जेव्हा आदिती तटकरेंना संधी देण्यात आली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. इतरांसोबत घराणेशाहीचा आरोप त्यांच्यावरही झाला, कठोर टीकेला सामोरं जावं लागलं. मात्र संयम राखीत, कुणालाही प्रत्युत्तर न देता आदिती तटकरे यांनी आपल्या कामातून टीकाकारांची तोंडं बंद करण्याचे धोरण स्वीकारले. महाराष्ट्राच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय या विभागांच्या राज्यमंत्री म्हणून कार्य करताना त्या सर्व विभागांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कालांतराने त्यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली. ज्या मतदारसंघातून त्या निवडून आल्या त्या श्रीवर्धन मतदारसंघात पर्यटनवाढीसोबतच मत्स्यव्यवसायाच्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रासाठी शासकीय जागा प्रदान करणे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत सुपारी संशोधन प्रकल्पासाठी जमीन प्रदान करणे, महिला महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम, दिवेआगार येथील सुवर्ण गणेशाचे दागिने मुद्देमाल हस्तांतरणाबाबत उच्च न्यायालयात पाठपुरावा करणे, तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम, त्यासाठी वाढीव रु. १ कोटींचा निधी मंजूर करण्यासारखी अनेक कामे त्यांनी आजवर केली आहेत. यासोबतच महाड येथे एनडीआरएफ च्या कायमस्वरूपी बेसकँम्पसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुलासाठी रु. ७ कोटींचा निधी मंजूर करणे, तळा येथे आपत्ती व्यवस्थापनाकरिता हेलिपॅडसाठी शासकीय जमिनीची उपलब्धता करून देणे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्र उभारणीसाठी जमीन प्रदान करणे, आराखडा तयार करून घेणे अशी कामे त्या हिरिरीने करीत आहेत. श्रीवर्धन मतदारसंघासोबतच पोलादपूर, पेण, खालापूर, पनवेल, कर्जत, उरण या तालुक्यांमध्येही अनेक विकासकामे आदिती तटकरे प्राधान्याने करीत आहेत. सुधागड येथे आदिवासी समूहाकरिता बहुद्देशीय संकुलासाठी शासकीय जमिनीची निश्चिती, अलिबाग येथे पर्यटनवाढीसाठी प्रयत्न, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन प्रदान करणे, मुरुड येथील पर्यटन विकास, रोहा तालुक्यात कोलाड येथे शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय तसेच कृषी संशोधन महाविद्यालयासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
    या व्यतिरिक्त राज्यपातळीवरही त्यांच्याकडे असलेल्या सर्व विभागांची कामे त्या कौशल्याने हाताळताना दिसतात. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी तसेच विरोधक आमदारांच्या सर्व प्रश्नांची आत्मविश्वासपूर्ण उत्तरे देताना त्यांना पाहून सभागृहात कागद हातात न धरता अभ्यासपूर्ण भाषण करणाऱ्या त्यांच्या वडिलांची खा.सुनिल तटकरेंची छबी अनेकांना दिसली. आपल्या वयाबाबत न्यूनगंड न बाळगता हाती असलेल्या समाजकारणाच्या शिदोरीवर राजकारणाचे शिवधनुष्य आदिती तटकरे लीलया पेलताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील अनेक युवतींसाठी, महिलांसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्व ठरत आहेत. लहान वयात मोठे अधिकार प्राप्त झाले मात्र त्याहूनही मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आल्या आहेत, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. 
     कोकण विभागात खा. सुनिल तटकरे व आपले बंधू आमदार अनिकेत तटकरे यांच्या साथीने  अनेक विकासकामांचा त्यांनी धडाका लावला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती जनतेकडून त्यांना वेळोवेळी मिळतच आहे. नुकतंच एके ठिकाणी भाषणात खा. सुनिल तटकरे यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख 'बाप से बेटी सवाई' असा केला. हे सवाई कार्य आपल्याला करून दाखवायचे आहे, ही जिद्द आदिती तटकरे यांच्या ठायी पहायला मिळते. मातब्बर राजकारणी व सहकाऱ्यांसोबत दडपण न घेता, आत्मविश्वास व सचोटीने त्या मार्गक्रमण करीत आहेत. ही तर सुरुवात आहे, या प्रवासात आणखी अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याचे बळ त्यांच्या पंखांत आहे.

*ज़िंदगी की असली उड़ान अभी बाकी है*
*जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है*
*अभी तो नापी है मुट्ठीभर ज़मीन तुमने*
*अभी तो सारा आसमान बाकी है|*

        राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.कु. आदिती सुनिल तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छूक :-
तृप्ती देवरुखकर

माहिती संकलन
कु.श्रीकांत बिरवाडकर (पत्रकार)
म्हसळा - रायगड

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा