किरण शिंदे/ लोणेरे
११ फेब्रुवारी माणगाव तालुक्यातील उणेगाव गावातील महाशिवरात्री उत्सवाची मोठी ख्याती आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. मात्र या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय उणेगाव ग्रामस्थांनी घेतला. तसेच मंदिरात गर्दी होऊ नये या करीता ही विशेष काळजी घेतली गेली. मंदिराच्या आवारात सामाजिक अंतर ठेवून तसेच भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
दरवर्षी उणेगाव गावची यात्रा म्हटली म्हणजे पंचक्रोशीतील सर्वांसाठी पर्वणीच असते. ५ दिवस मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ श्री काळभैरव उत्सवाची तैयारी करून कार्यक्रम नियोजनबद्ध करतात. पहिल्या दिवशी महाशिवरात्री च्या आदल्या दिवशी सकाळी ल्हाट ( बगाड) आणण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडतात. संध्याकाळी ल्हाट गावात आणली की तिची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री निमित्ताने श्री सत्यनारायण पुजेचे आयोजन केले जाते. तसेच तिसर्या दिवशी गावची यात्रा भरते आणि चौथ्या दिवशी गावात पालखी सोहळा साजरा केला जातो. अशा प्रकारे चार दिवस गावात अगदी आनंदाचे वातावरण असते. या उत्सवासाठी गावातील सर्वच लोक तसेच कामा निमीत्त बाहेर गावी राहणारे सर्व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित राहतात.
या वर्षी यात्रेच्या दिवशी गर्दी होऊ नये यासाठी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच गावची यात्रा ही रद्द करण्यात आली. भाविकांसाठी प्रसादासाठी फक्त एक दुकान चालू ठेवल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. तसेच भाविकांनी उगाचच गर्दी करू नये यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
जगावर आलेल्या कोरोना रोगाचे सावट लवकर जावो आणि कोरोनाला भस्मसात करून टाकणासाठी उणेगाव ग्रामस्थांनी श्री काळभैरवला साकडे घातले.
Post a Comment