● संगणकपरिचालकांना ग्रामपंचायतस्तरावर कर्मचारी म्हणून लवकरच नियुक्त करणार - ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ
● लेखी आश्वासनाप्रमाणे शासनाने संगणक परिचालकांना लवकर न्याय द्यावा - राज्यसचिव मयुर कांबळे
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राज्यातील हजारो ग्रामपंचायत संगणकपरिचालकांचे मागील 18 दिवसापासून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा किंवा सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देणे या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.सिद्धेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व सर्व संगणक परीचालकणाच्या सहकार्याने मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन रात्रंदिवस सुरू होते. या आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानात घुसून संगणकपरिचालकांनी आंदोलन केले होते.त्यानंतर 2 मार्च ला रात्री 11 वाजता या आंदोलनावर लाठीचार्ज झाला. संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले व आंदोलक संगणकपरिचालकांना आझाद मैदानाबाहेर काढले तरीही दुसऱ्या दिवशी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे हे आझाद मैदानाच्या गेटवर आंदोलन करण्यास गेले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व सुमारे 60 तास नजरकैदेत ठेवले तरीही दररोज मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन सुरूच होते.
शासनाच्या वतीने ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांनी 3 बैठका घेतल्या व ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्यसचिव मा.राजेशकुमार यांच्या सोबत 2 बैठका झाल्या त्यात सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत स्तरावर एक संगणकपरिचालक कायम स्वरूपी असावा अशी शिफारस यावलकर समितीने केली होती. परंतु शासनाने तो अहवाल स्वीकारला नव्हता. 9 मार्च रोजी तो अहवाल स्वीकारला व 10 मार्च रोजी ग्रामविकास विभागाने त्यास मान्यता दिली आणि 11 मार्च रोजी ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली व त्याच ठिकाणी फाईल वर स्वाक्षरी करून सामान्य प्रशासन व अर्थ विभागाकडे फाईल पाठवली व राज्य संघटनेला लेखीपत्र देऊन लवकरात लवकर संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देण्याचा विश्वास दिला त्यानुसार 18 दिवसापासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.मयुर कांबळे यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास!
संगणकपरिचालकांचे आंदोलन हे अनेक मुद्यांमुळे गाजले,त्यात रात्रंदिवस आंदोलन,मंत्र्यांच्या बंगल्यात घुसून आंदोलन,लाठीचार्ज, आझाद मैदान,विधानभवन,मंत्रालय,राणीबाग,भायखळा,आझाद मैदान गेट,मरीन ड्राईव्ह,वडाळा,एम आरए मार्ग अशा अनेक ठिकाणी दररोज आंदोलन सुरूच होते त्यामुळे शासन व आंदोलकांच्या मध्ये पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून येत होते पण आंदोलक आंदोलनावर ठाम असल्यामुळे पोलीस प्रशासन हतबल झाले होते,त्यात 16 मार्च ला राणीबाग,भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आल्याची घोषणा केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती परंतु लेखी आश्वासनामुळे संगणकपरिचालक संघटनेचे आंदोलन स्थगित केल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला!
संगणकपरिचालक संघटनेने केला पोलिसांचा सन्मान!
संगणकपरिचालक व पोलीस यांची या आंदोलनामध्ये बरीच चकमक झाली परंतु संगणकपरिचालक आपल्या मागणीवर ठाम असल्याने आंदोलन करत होते व पोलीस आपले कर्तव्य पार पाडत होते परंतु पोलिसानी चोख कर्तव्य पार पाडत असताना त्यांचा सन्मान आवश्यक असल्यामुळे मुंबई पोलिस दलातील,पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस निरिक्षक व पोलीस कर्मचारी या सर्वांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
Post a Comment