दांडगुरी ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित


जिल्ह्यात शिवकर ग्राम पं.तर तालुक्यात दांडगुरी ग्राम पं.प्रथम*
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत देण्यात येणारा सन २०१८-१९ व २०१९-२० या वर्षींचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आर.आर.(आबा) पाटील "सुंदर गाव पुरस्कार" (स्मार्ट ग्राम) वितरण सोहळा अलिबाग येथील जिल्हा परीषदेच्या कै.प्रभाकर पाटील सभागृहामध्ये मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगीता पारधी,उपाध्यक्ष सुधाकर घारे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे,महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव,समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर,विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे,ॲड.आस्वाद पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शीतल पुंड,शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. 
कोरोना महामारीने उद्भवलेल्या परीस्थितीमुळे सदर पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडला होता. 
जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना त्यांनी राबवलेल्या उपक्रमानुसार गुणांकन देउन तालुकास्तरीय पुरस्कार देण्यात आले.जिल्हास्तरीत प्रथम क्रमांकाचा मान पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने पटकावला. श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ या सालासाठी घेण्यात आलेल्या  स्पर्धेमध्ये निर्धारीत निकषामध्ये तालुक्यातुन सर्वाधिक गुण प्राप्त करुन सुंदर गाव पुरस्कार पटकावुन तालुक्यामध्ये आपली वैशिष्ट्यपुर्ण ओळख निर्माण केली.दांडगुरी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन पाटील,उपसरपंच दत्तात्रेय पांढरकामे व तत्कालीन ग्रामसेवक शंकर मयेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड झालेल्या दांडगुरी ग्रामपंचायतीला पुरस्काराच्या रुपाने दहा लाख रु.अनुदान मिळणार असुन हा निधी ग्रामीण विकास कार्यक्रम, स्मार्ट ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी वापरावयाचा आहे. याआधी सन २०१७ साली "जलसंवर्धन लोक चळवळीतून व श्रमदानातून" या उपक्रमातंर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक व एक लक्ष रुपये हा पुरस्कारही दांडगुरी गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते देण्यात आला होता.
ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने शासनाची स्मार्ट ग्राम हि संकल्पना अलीकडील काळात महत्वाची भुमीका निभावत आहे.दांडगुरीचे विद्यमान व माजी सरपंच,उपसरपंच सदस्य यांच्या सहकार्याने तत्कालीन ग्रामसेवक श्री.शंकर मयेकर यांनी शासनाच्या योजना व उपक्रम राबविताना केलेले योग्य नियोजन व त्याला ग्रामस्थांची लाभणारी साथ यामुळेच तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान दांडगुरी ग्रामपंचायतीला मिळाला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा