स्त्री जागृती ही काळाची गरज आहे... प्रतीक लंबे न्यायाधीश
र ना राऊत महाविद्यालयात कायदेविषयक मोफत शिबीर संपन्न
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
भारतीय संविधानाने समाजातील प्रत्येक घटकास समान हक्क बहाल केलेले आहेत. काळानुरूप भारतीय समाज अतिशय प्रगल्भ झालेला आहे. स्त्री व पुरुष हा भेदभाव कालबाह्य ठरलेला आहे . आजमीस स्त्रीला तिच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी स्त्री जागृतीची आवश्यकता आहे असे प्रतिपादन श्रीवर्धन न्यायालयातील न्यायाधीश प्रतीक लंबे यांनी केले आहे. श्रीवर्धन शहरातील र ना राऊत महाविद्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिर प्रसंगी प्रतिक लंबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनीशी संवाद साधला. आपल्या कायद्याने स्त्रीला संरक्षण दिलेले आहे. अनेक वाईट रूढी परंपरा आपल्या प्रगल्भ समाजाने नाकारलेल्या आहेत. व्यक्तीची वृत्ती आणि कृती दोन्ही वरती कायद्याची बंधने आहेत. स्त्रीला सक्षम करण्यासाठी विविध समाजसुधारकांनी अतिशय उच्च दर्जाचे प्रयत्न केलेले आहेत. महिला वर्गामध्ये अनेक समाज सुधारणा घडवून आणणार्या स्त्रिया जन्माला आलेले आहेत. सावित्रीबाई फुले, डॉ आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे अशा अनेक स्त्री सुधारकांनी समाज घडवलेला आहे. तुमच्यावरती होणारा अन्याय तुम्ही सहन न करता त्या अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे त्याला वाचा फोडली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पुढे येण्याची हिंमत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही न्याय देऊ शकत नाही . माणसाच्या मनामध्ये जोपर्यंत का हा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची प्रगती शक्य नाही. आज तुम्ही सर्वजणी शिक्षण घेऊन तुमच्या आयुष्याचा पाया भक्कम करत आहात. आजच्या या शिक्षणामुळे तुमचे भविष्य उज्वल होणार आहे. वर्तमानात जे शिकाल त्यापासून भावी काळामध्ये लढण्याची शक्ती मिळणार आहे. असे न्यायाधीश प्रतिक लंबे यांनी सांगितले. सदरच्या कायदेविषयक शिबिरात वकील संघटनेच्यावतीने मालिका श्रीवर्धकर, संजीव डेगवेकर, अतुल चौगुले,विठोबा पाटील व जयदीप तांबुटकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले. र ना राऊत महाविद्यालयाचे प्राचार्य, सह शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Post a Comment