म्हसळा शहरातील मतदाराने नगरपंचायतीच्या कारभाराची परिक्षण करण्याची हीच खरी आहे वेळ
भारतीय जनता पार्टीने दिले सर्वेक्षणाचे अवाहन
संजय खांबेटे : म्हसळा
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात म्हसळा,तळा व माणगाव नगरपंचायत नवनिर्मिती असून या तीनही नगरपंचायतींच्या पहिल्या टर्म चा कालावधी पूर्ण होत आला असून लवकरच निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे.तीनही नगरपंचाय तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे व पर्यायाने महाविकास आघाडीची एक हाती सत्ता आहे.पूर्णपणे सत्तेत असताना स्थानिक विकासाचं उद्दिष्ट किती पूर्ण झालं याचा अभ्यास त्या त्या नगरपंचायत हद्दीतील मतदाराने करण्याची हीच वेळ योग्य असेल असे भाजपचे स्पष्ट मत असून त्या पद्धतीने म्हसळा तळा व माणगाव येथील मतदाराने अभ्यास करावा असे अवाहन भाजपचे कृष्णा कोबनाक यांनी म्हसळा येथील पत्रकार परिषदेत केले, यावेळी त्यांचे समवेत तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, शहर अध्यक्ष संतोष पानसरे उपस्थित होते.
म्हसळा नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून आज मितीस राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्यायाने महाविकास आघाडीची पूर्णपणे सत्ता नगरपंचायती वर आहे.पक्षीय बलाबल राष्ट्रवादी काँग्रेस१३,काँग्रेस (आय) ३, शिवसेना१,अपक्ष १ असे आहे. नगरपंचायतीच्या पाच वर्षाच्या कालावधीत तब्बल चार नगराध्यक्षांची नेमणूक होऊनही नगरपंचायतीच्या चारही नगराध्यक्ष किंवा उर्वरित नगरसेवकांचा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अद्यापही अभ्यास झाला नसल्याचे चित्र आजचे आहे. म्हणूनच यावेळी पारदर्शकपणे मतदान होण्यासाठी मतदारांनीच अभ्यास करून आपले उमेदवार ठरविणे हेच योग्य ठरणार आहे असे कृष्णा कोबनाक यांनी सांगितले.
शहरातील स्वच्छता,बाजारपेठे व शहरातील अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती ,पाणीटंचाई आरोग्य सुविधा,अनधिकृत बांधकाम व सतत होणारे वाहतूक कोंडी याबाबत नगरपंचायत प्रशासनाने मागील चार वर्षात ठोस भूमिका घेतलेली नाही,नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे येथील जनता नगरपंचायत प्रशासनास कंटाळ्याचे दिसत आहे.
भाजपा करणार सर्वेक्षण
म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ढिसाळ कार्यक्रमामुळे शहरांतील विकास योग्य तऱ्हेने झाला नाही हाच मुद्दा घरत भाजप शहरातील प्रतिष्ठित व अभ्यासू मतदारांना जनतेच्या हिताचे विविध १० प्रश्न देऊन सर्वेक्षण कार्यक्रम कालबद्ध रित्या राबवणार आहे यामध्ये पुढील महत्वाचे प्रश्न असणार आहेत ते पुढील प्रमाणे
१) शहरांत पाण्याची समस्या आहे का? सर्वाना समान व योग्य दाबाने, स्वच्छ, शुद्ध व पिण्यास योग्य पाणी मिळते का?
२) शहरांतील अंर्तगत रस्ते सुसज्ज आहेत का?
३) बाजारपेठेत स्वच्छता सातत्याने केली जाते का?
४) बाजार पेठेत व आठवडा बाजारात सार्वजनिक शौचालय सुविधा व महीलांसाठी स्वंतत्र शौचालय सुविधा आहे का?
५) शहरांतील रस्त्यांवरील व हद्दीतील गाव वाड्यांवर दिवाबतीची सुविधा सुरळीत राबविण्यांत येते का?
६) शहरांतील नागरिकांसाठी आरोग्यसेवा उत्तमरीत्या राबविली जाते का?
७) आपल्या प्रभागातील नगरसेवकांचा संर्पक व आपणा जवळ मतदार म्हणून समन्वय कसा आहे?
८) शहरांतील अनधिकृत बांधकामाबाबत नगरपंचायत लक्ष देते का?
९) शहरांतील वहातुक कोंडी, पार्कींग बाबतीत शाश्वत उपाय योजना होत आहे का?
१०) शहरांतील जेष्ठ नागरिकांसाठी नगरपंचायतीने कोणकोणत्या सुविधा उभारल्या आहेत?
शहरातील वकील, डॉक्टर ,व्यवसायिकसामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी, महीला मतदार यांच्या जवळ भाजपा कार्यकर्ते प्रत्यक्ष संर्पक साधून सर्वेक्षण करणार आसल्याचे कोबनाक यानी सांगितले.
Post a Comment