तालुक्यातील आदिवासी वाड्यातील कुटुंबियांना सामाजिक संस्थांकडून निवाऱ्याची व स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप


म्हसळा तालुक्यातील आदिवासी वाड्यातील कुटुंबियांना सामाजिक संस्थांकडून निवाऱ्याची व स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप
( म्हसळा प्रतिमिधी)जून महिन्यात ‘निसर्ग चक्रीवादळाने’ कोकण किनारपट्टीवरील गाव वाडयाना मोठया प्रमाणांत तडाखा बसला, त्यामुळे वनातील झाडे, वन्यजीव,घरे,फळपिकांच्या बागा, वीज तारा, रस्ते यांचे कोट्यावधींचे आर्थिक नुकसान झाले. समाजातील सर्वच स्तरातील लोकांचे अतोनात नुकसान झाले. जंगलाला लागून वास्तव्य करीत असलेले आदिवासी वाड्या- वस्ती, खाडी लगत असलेले कोळी वाडे व मोलमजुरी करणारे मुस्लीम दलित व भटक्या-विमुक्त जमातींच्या कुटुंबियांचे ज्यांच्याकडे उपजीविकेचे साधन नाही अशा कुटुंबांची घरे तसेच घरातील सामानांचे नुकसान झाल्या कारणाने त्यांचे संसार उघड्यावर पडले होते. दिल्ली स्थित इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी व इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड ह्या जागतिक स्तरावरील संस्थेने मदतीचा हात देऊ केला. मदती मध्ये निवाऱ्याच्या हेतूने दोन ताडपत्र्या एक छत झाकण्यासाठी तसेच एक जमिनीवर अंथरण्यासाठी, बांधण्यासाठी दोर, दोन मच्छरदाण्या, तसेच स्वच्छतेसाठी झाकणाासहित बादली व मग, सहा अंघोळीचे साबण, धुण्याचा सोडा, पाणी निर्जंतुक करण्यासाठीच्या गोळ्या, पाच मास्क, एक सानिटायजर अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत शासकीय आश्रमशाळा, कादवण वेरळ जिल्हा रत्नागिरी येथील कल्याण जाधव हे आदिवासी समुदायातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गावोगाव जनजागृतीचे काम करीत असताना, वादळामुळे झालेल्या नुकसानीत मुलांची कशी होरपळ होते हे अनुभवले त्यानंतर त्यांनी अशा कुटुंबांना काही मदत मिळू शकते का ह्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या ह्या प्रयत्नांना सामर्थ्य संस्थेने साद देऊन मदतीचा हात दिला. म्हसळा तालुक्यातील एकूण ३२ वाड्यातील १३५३ कुटुंबापर्यंत हि मदत पोहोचवली गेली. एका किटची किमत साधारणपणे रु.चार हजार असून जवळपास पन्नास लाख रुपयांची मदत इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड संस्थेकडून देण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर अनेक कंपन्यादेखील पुढाकार घेताना दिसतात, त्यात वेगवेगळ्या डिजाईनचे कपडे तयार करणारी भारतातील नामांकित ‘फॅब इंडिया’ ह्यांनी सामाजिक बांधिल कीची जाणीव ठेऊन ग्रामीण भागात उच्च दर्जाचे मास्क विना मुल्य वाटप करण्यासाठी देऊ केले. म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, कृषी विभाग, वन विभाग तसेच सार्वजनिक वाचनालय आदींना
अशा मास्कचे वाटप करण्यात आले. दहा पी.पी.इ.कीटचे वाटप ग्रामीण रुग्णालयास करण्यात आले.आदिवासी विभागातील कर्मचारी श्री कल्याण जाधव यांनी विशेष प्रयत्न करून आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. हरीशचंद्र मांडवकर, महेश माने व तेजश्री रिकामे यांच्या प्रयत्नांनी तसेच श्री एल.पी. खोत यांचे सहकार्याने कार्य यशस्वी केले.

“आम्हाला निवाऱ्याची व स्वच्छता ठेवण्याची सोय झाली त्याचबरोबर शिक्षणाचे महत्व देखील पटले, आमच्यासाठी शासनाने एवढी सोय केली आहे परंतु आम्हाला याची कल्पना नव्हती. आम्ही आता आमच्या मुलांना शाळेत पाठवू” 
-हरीशचंद्र वाघे, आदीवासी वाडी 

“सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे कि, वंचित घटकांना नैसर्गिक आपत्ती मध्ये मदतीचा हात दिला पाहिजे, त्यासाठी इतर संस्थांची मदत मिळते, आपल्याला त्यासाठी प्रयत्नशील रहावे लागते. आम्ही राबविलेल्या ह्या कामात लोकांनी तसेच स्थानिक प्रशासनाने चांगले सहकार्य केले.”
रंजीता पवार, मुख्याधिकारी, सामर्थ्य संस्था

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा