बँक बॅलन्सपेक्षा माणसं कमावणं खरी श्रीमंती...!


बँक बॅलन्सपेक्षा माणसं कमावणं खरी श्रीमंती!
दै. निर्भीड लेखच्या दीपावली विशेषांकाचे शानदार प्रकाशन

टीम म्हसळा लाईव्ह
बँक बॅलन्सची जीवनात गरज आहेच परंतु त्यापेक्षा माणसं कमावणं, ती सोबतीला उभी राहणं, हाकेला धावून येणं ही खरी जीवनातील श्रीमंती आहे. हल्ली माणसं विकतही आणली जातात कार्यक्रमाला, त्यांच्या चेहर्‍यावर ती छटा स्पष्ट दिसते आणि मनातून, अंतरंगातून एका ओढीने आलेली माणसं लगेच ओळखून येतात. मला वाटतं कांतीलाल कडू यांनी जीवाभावाची माणसं निर्माण केलीत, असे भावोद्गार ज्येष्ठ नाट्याचार्य, कादंबरीकार, अभिनेते आणि थोर विचारवंत अशोक समेळ यांनी काढले.
कांतीलाल कडू संपादित दै. निर्भीड लेखच्या २३ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते शहरातील तथास्तु हॉलमध्ये शानदारपणे झाले. त्याप्रसंगी त्यांनी साहित्याचा एक एक कोनारा आपल्या अमृतवाणीने सुंगधित करताना उपस्थित सारस्वतांच्या मनाचा ठाव घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कविवर्य सतिश सोळांकुरकर हे होते. व्यासपिठावर ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कवी कांतीलाल कडू उपस्थित होते.
समेळ यांनी स्वतः ६० हून अधिक नाटकं लिहिली. मराठी, गुजराथी रंगभूमी गाजवली. तात्यासाहेब शिरवाडकरांपासून हास्यअभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी आपल्या खास शैलीत सांगताना अभिनयाचा उत्तम नमूना आणि संवाद फेकीतून सभागृहात टाळ्यांचा पाऊस पाडला.
दै. निर्भीड लेखच्या दिवाळी अंकातील हसवाफसवी या सदराचा संदर्भ देताना ते म्हणाले की, लक्ष्मीकांत बेर्डे माझा दोस्त होता. मी एक वर्षाने शाळेत त्याला सिनियर होतो. त्याला वर्गशिक्षिका बाहेर उभे करून ठेवण्याची शिक्षा करत, अलिकडच्या वर्गाबाहेर मी असायचो... दोघेही एकमेकांना नजरेनेच खाणाखुणा करून समदुःखाची देवाणघेवाण करत असू हेसुद्धा त्यांनी उत्तमरित्या अभिनयातूनच सांगितले, तेव्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
नटसम्राट ही अजरामर झालेली कलाकृती आहे, असे म्हणत त्यांच्या आणि तात्यासाहेबांच्या भेटीचे काही किस्से आणि नाटकाची संहिता, संवादातून त्यांनी नटसम्राटाचे रंगमंच निर्माण केले होते. अशोक समेळ ही अभिव्यक्ती व्यक्त होताना पनवेलच्या उपस्थित सारस्वतांचा समुदाय देहभान हरपून गेला होता.
सुधाताईंसोबत नाशिकला तात्यासाहेबांना भेटायला गेला होतो, अशी सुरूवात करून पनवेलकरांसमोर मराठी भाषेचा दागिना असलेले तात्यासाहेब त्यांनी उभे केले. जाताना श्रीखंड घेवून गेलो होतो, अशी गोड आठवणही त्यांनी सांगितली. त्यांना पाहताक्षणी त्यांच्यासमोर नतमस्तक झालो, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. तात्यासाहेबांचे मराठीवरील प्रेम, त्यांच्या लिखाणाजवळ जाणारे लिखाण मला फक्त अशोक बागवे यांचे वाटते, असे स्पष्ट मत समेळ यांनी व्यक्त केले.
नटसम्राट, अश्‍वत्थामा, भिष्माचार्य, पुत्रकामेष्ठी, कुसूम मनोहर लेले, आनंद आदी अजरामर झालेल्या नाटकांविषयी त्यांनी महत्वाचे पदर उलगडवून दाखविले. त्यांच्या त्या सळसळत्या अभिनयाला उपस्थितांनी डोळ्यात साठवून घेत आतुड्यांचे कान केले होते.
प्रार्थना निरर्थक आहे. दया दाखवा म्हणून ज्युलियस सिजर कधीच कुणाची प्रार्थना करत नाही आणि प्रार्थना केली म्हणून दया दाखवत नाही. धुव्राच्या चांदणीसारखा आहे. या असंख्य माणसांच्या जगात एक माणूस आहे जो ठामपणे उभा आहे आणि तो म्हणजे मी आहे ज्युलियस, मी ओथेलो, मी किंग आहे, नटसम्राट गणपतराव बेलवणकर आणि मी आहे साहित्यसम्राट कुसुमाग्रज तात्यासाहेब शिरवाडकर अशा अमोघपूर्ण वाणीने त्यांनी अनेक नाटकांतील संवादाची मेजवानीच रसिकांना दिली.
समेळ पुढे म्हणाले की, इथेच आम्ही नतमस्तक होतो. ही त्यांचीच देणगी आहे. यावेळी त्यांनी आनंद नाटकातील एक एक किस्सा ऐकवत खर्‍या प्रेमाची कहाणीही पेश केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल कडू यांनी केले. सोळांकुरकर यांचे स्वागत ऍड. प्रमोद ठाकूर यांनी तर समेळ यांचे स्वागत ऍड. गजानन पाटील यांनी केले.
ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, उद्योजक विजय लोखंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, समाजभूषण उत्तमराव गायकवाड, दुंदरेचे माजी सरपंच सुभाषशेठ भोपी, शिवसेनेच्या नेत्या अपूर्वा प्रभू, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, शिवसेना नेते लिलाधर भोईर, उद्योजक विनूशेठ पोटे, निवृत्त मुख्याधिकारी धुपे, निवृत्त नायब तहसीलदार दमयंती म्हात्रे, डॉ. राठोड, कवयित्री ज्योत्स्ना राजपूत, सामाजिक कार्यकर्ते रेवा देशपांडे, वंदना देवरे, महेंद्र भगत, निलेश काकडे, पत्रकार नाना करंजुले, संतोष घरत, विकास पाटील, विजय पाटील, कॉंग्रेसचे नेते सुधीर मोरे, युवा नेते विजय काळे, सामाजिक कार्यकर्ते बाबूशेठ जाधव, विकास भेंडे, राकेश केणी, सुनील महाडिक, दया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भिष्माचार्य कादंबरीचे अभिवाचन पनवेलला करणार...!

अश्‍वत्थामा कादंबरीच्या तीन आवृत्त्या आल्या, सहाशे-सातशे पानांची कादंबरी आहे. आता भिष्मांवर कादंबरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तिचे प्रकाशन झाले की, अभिवाचनाचा पहिला कार्यक्रम पनवेलला नक्की घेईन, त्याचे नियोजन कांतीलाल कडू यांनी करावे, असे समेळ यांनी सांगितले. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता, भिष्माचार्य आणि आपल्या विचारांचे स्वागत करण्यासाठी पहिल्या कार्यक्रमाचा मान स्वीकारल्याचे कडू यांनी घोषित केले.

नऊ महिन्यांनंतरचा पहिलाच कार्यक्रम

कोरोनाने जवळची माणसंही दूर गेली. त्यामुळे नऊ महिन्यांत कुणालाही भेटता आले नाही. कार्यक्रम टाळता येतात. पण कांतीलाल कडू यांच्या प्रेमापुढे त्यांचा कार्यक्रम टाळण्याचा विचारही मनाला शिवत नाही. म्हणून आज पहिल्यांदा घर सोडून जाहिर कार्यक्रमाला आलो आहे, अशी स्पष्ट कबुली समेळ यांनी यावेळी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा