टाळेबंदी व निसर्ग वादळानंतर ; दिवेआगरच्या रुपेरी वाळुत उमटली पर्यटकांची पाऊले


दिवेआगरच्या रुपेरी वाळुत उमटली पर्यटकांची पाऊले
टाळेबंदी व निसर्ग वादळानंतर पर्यटन व्यवसायाचा श्रीगणेशा
मकरंद  जाधव-बोर्लीपंचतन 
कोरोना महामारीमुळे झालेली टाळेबंदी व निसर्ग चक्रीवादळाचा श्रीवर्धन तालुक्याला बसलेला अनपेक्षित फटका यामुळे संपुर्ण तालुक्याचे अर्थचक्र गेले आठ महीने ठप्प झाले.तालुक्यातील प्रमुख व्यवसाय असणारा पर्यटन उद्योग व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसल्याने पर्यटन व्यवसायाचे कंबरडेच मोडले.
 समुद्र पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेली श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टी गेले आठ महीने पर्यटन व्यवसाय बंद असल्याने ओस पडली आहे.त्यामुळे व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले.शासनाने आता अर्थ चक्राला गती देण्यासाठी आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन करुन पर्यटन व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिल्याने व्यावसायिकांनी आपला व्यवसाय योग्य ती काळजी घेऊन सुरु केला आहे.परंतु त्यांना आता प्रतिक्षा आहे ती पर्यटकांच्या प्रतिसादाची...
   गेले आठ महीने पर्यटनासाठी बाहेर न पडता आल्याने पर्यटकसुध्दा हळु हळु पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. पुणे मुंबईतील पर्यटकांचे मौज मजेसाठी व कोकणी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील आवडते प्रसिध्द पर्यटन क्षेत्र दिवेआगर येथील निळ्याशार समुद्राच्या रुपेरी वाळूत पर्यटकांची पावले पुन्हा उमटु लागल्याने छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांबरोबरच त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांनासुध्दा येणाऱ्या दिवाळी सणामध्ये पर्यटन व्यवसाय बहरेल अशी आशा निर्माण झाली असुन टाळेबंदी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या धक्क्यातुन सावरत पुन्हा नव्याने आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा करण्यासाठी तालुक्यातील व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

कोरोना महामारी आणि निसर्ग वादळाच्या फटक्याने ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय आत्ता हळु हळु सुरु होत आहे.त्यासाठी शासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन दिलेली नियमावली याचे तंतोतंत पालन करुनच आपले,आपल्या गावचे व येणाऱ्या पर्यटकांचे आरोग्य सुरक्षित राहील याची योग्य ती खबरदारी घेउन आम्ही पर्टकांना आमची सेवा देत आहोत.
जितेंद्र पाटील, पाटील खानावळ-दिवेआगर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा