अलिबाग (प्रतिनिधि) : 'साहित्यसंपदा' समूहाचा द्वितीय वर्धापनदिन श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम, परहूरपाडा अलिबाग येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलाने झाली. रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, जेष्ठ साहित्यिक देवेंद्र केळुसकर, रिलायन्स इंडस्ट्रिज नागोठणेचे जनसंपर्क अधिकारी आणि साहित्यिक रमेश धनावडे, वृद्धाश्रम संस्थापक ऍड. जयेंद्र गुंजाळ, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे, रायगडमधील सामाजिक कार्यकर्त्या जीविता पाटील, लेखक कवी श्रीकांत पेटकर, टेकनोवा कंपनीचे मॅनेजर शरद जाधव,अमित हर्डीकर ह्यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास लाभली.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलाने झाली. अॅड. जयेंद्र गुंजाळ ह्यांनी वृद्धाश्रम चालवतांना येणाऱ्या समस्यांची जाणीव उपस्थितांना करून देताना गेल्या २० वर्षातील कार्याची ओळख करून दिली. नागेश कुलकर्णी ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजसेवेसाठी मार्गदर्शन केले त्याच सोबत साहित्यसंपदा समूहाने राष्ट्रीय आणि जागतिक विक्रमाला गवसणी घातल्याबद्दल डायमंड बुकतर्फे देण्यात आलेले सन्मानचिन्ह समूह प्रशासकीय समिती आणि अश्विनी वराळे, दिलीप मोकल, सिद्धी गुंड आदी सदस्यांना प्रदान केले. जेष्ठ साहित्यिक देवेंद्र केळुसकर यांनी साहित्यिकांनी सीमा ओलांडून वैश्विक दृष्टिकोनातून काम करावे असे आवाहन उपस्थित साहित्यिकांना केले.
रिलायन्स नागोठणेचे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आणि समूहात मार्गदर्शक भूमिका बजाविणारे रमेश धनावडे यांनी समूहाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आणि आगामी प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या. वर्षभरात घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण या सोहळ्या दरम्यान करण्यात आले. मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर व अन्य भागातील सदस्य सदर सोहळ्यास उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या रायगड मधील सन्माननिय प्रभाकर धनावडे , अनुराधा खातू, प्रमोद खातू या शिक्षकांचा "शिक्षक रत्न " पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. लॉक डाऊन मध्ये करोनाची पर्वा न करता समाजासाठी झटणाऱ्या रमेश धनावडे, डॉ. शुक्लिमा पोटे आणि स्मित शिवदास यांच्या कार्याची दखल घेत "करोना योद्धा" म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. सामाजिक कार्यात हिरीहिरीने भाग घेऊन समाज मूल्ये जपण्यास योगदान देणाऱ्या कौसल्या पेटकर आणि साहित्य चळवळीस हातभार लावणारे डॉ योगेश जोशी, गुरुदत्त वाकदेकर यांचा 'समाज संजीवनी" पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. नवरात्रीत पार पडलेल्या सन्मान तिच्या प्रतिभेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांनुसार काव्यवाचन स्पर्धेतील विशेष पुरस्कार अश्विनी बोलके आणि 'मी सौंदर्यवती' पुरस्कार मानसी नेवगी यांना प्रदान करण्यात आला.
विश्वविक्रमी काव्यसंमेलनाच्या आयोजनात महत्वपूर्ण कामगीरी बजावणाऱ्या स्मिता हर्डीकर, सीमा पाटील, सोनाली शेडे यांना डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे सन्मानित करण्यात आले. नियोजन क्षेत्रात अभिनव कल्पनांनी आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या मनोमय मीडिया निर्माते राहुल तवटे ह्यांना "नियोजक रत्न" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी "पुस्तक रत्न " पुरस्कार मनातील पाने पुस्तकाच्या कवयित्री सलोनी बोरकर आणि पल्लवी पतंगे ह्यांच्या "चैत्र पालवी" चारोळी संग्रहास देण्यात आला. जुन्या साहित्यिकांच्या साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी घेण्यात आलेल्या काव्यपाठांतर स्पर्धेचे विजेते हनुमंत देशमुख, डॉ शुक्लिमा पोटे ह्यांना गौरविण्यात आले. साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांच्या "माझा एकलेपणा" आणि साहित्यसंपदा प्रशासकीय समिती मधील स्मित शिवदास ह्यांच्या "चांदणवेल " पुस्तकाचा वितरण समारंभ या प्रसंगी पार पडला .
साहित्य क्षेत्रात योगदान देत असताना वर्धापनदिनानिमित्त वृद्धांना विविध भेटवस्तू दिवाळी निमित्त देऊन त्यांच्या सुखदुःखात सामिल होत समूहाने आपण समाजाचे देणे लागतो हे परत एकदा कृतीतून सिद्ध केले. येत्या दिवाळीत बोली भाषा महोत्सव समूहातर्फे साजरा करण्यात येणार असून आगरी, खांदेशी, पोवारी, लेवागण बोली, मालवणी अशा बोली भाषा संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. बोली भाषा संवर्धंनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल समूहातील विविध स्तरांतून साहित्यसपंदा समूहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment