पालघर (गुरुदत्त वाकदेकर) : १० नोव्हेंबर २०२० रोजी जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील भारोळ या आदिवासी पाड्यावरील ग्रामीण विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ग्रंथालय / अभ्यासिकेची उभारणी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भारोळ येथे करण्यात आली. यात ५०० हून अधिक पुस्तकांचा संच, सुसज्जीत बैठक व्यवस्था तसेच हवेशीर जागा उपलब्ध करून देण्यात आली. कै. जनार्दन विष्णू मुद्गुल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी आदिवासी भागातील शालेय मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमास आर्थिक सहाय्य केले होते. तसेच साठ्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व अभय वेदपाठक यांनीही विशेष सहाय्य केले. पहिली ते नववी पर्यंतच्या ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना अवांतर वाचनासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे ग्रंथालय खरंच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक मनोज राऊत यांनी दिला. लॉकडाऊन सारख्या काळात मुलांना शाळा बंद असल्याने घरी बसून अभ्यास करावा लागतो त्यातही ग्रंथालये सुरू झाल्याने, आदिवासी पाड्यांमधली ही मुलं वाचनाची आवड जोपासून स्वतःच्या जीवनाच्या उत्कर्षास पोषक वातावरण निर्माण करू शकतात, असा विश्वास शाळेचे शिक्षक जयराम बोंगे यांनी व्यक्त केला. या ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी कै. जनार्दन विष्णू मुद्गुल यांची मुलं, जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त रामचंद्र परब, सुनिल पाठक व सभासद,साठ्ये महाविद्यालयाचे सहाय्यक प्राचार्य विनोद गवारे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखमा कडव व सर्व सदस्य उपस्थित होते.
आदिवासी पाड्यातील मुलांसाठी ग्रंथालयाची उभारणी
Admin Team
0
Post a Comment