■ शिवसेना कोणासमोर लोटांगण घालून झुकत नाही - जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांचा इशारा
◆ राज्यातील सत्तेत शिवसेना व राष्ट्रवादी युती आहे परंतु रायगड जिल्ह्यात महायुती नाही - माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचे प्रतिपादन
◆ तटकरे कुटुंबावर सडकून टीका
◆ माजी आमदार अवधूत तटकरे यांनी मेळाव्याकडे फिरवली पाठ
● म्हसळ्यात शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
आगामी काळात रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यात आघाडी होणार की नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ मंडळी घेणार आहेत त्यामुळे आघाडीबाबतचा निर्णय काय असणार ते नंतर बघू पण येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमखु नेते करीत आहेत.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत "एकला चलो रे" चा नारा दिला त्यामुळे निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात महाआघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत शिवसेना राष्ट्रवादीसोबत गेली तर भविष्यात आपली अवस्था शेकाप व काँग्रेस सारखीच होईल असा सूचक इशारा देखील शुक्रवार दि.30 ऑक्टोबर रोजीच्या आयोजित मेळाव्यात शिवसेनेच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी दिला.
यावेली सर्वच प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे व राज्य मंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. सत्तेतील विविध पदे भूषवणारे बलाढ्य शक्ती विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिक लढत असल्याने शिवसैनिकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने शेकाप व काँग्रेस सारखीच शिवसेनेची हालत होणार नाही याकरिता नक्कीच खबरदारी घेतली जाईल असे सांगत रायगड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या खांद्यावर जिल्हा संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयत्यावेळी भाजप पक्षाने घुमजाव केल्याने शिवसेनेला महाविकासआघाडी सोबत जावे लागले असून जिल्ह्यात खासदार तटकरे सोयीचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी करून आगामी म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत नियोजन बद्द व्यूहरचना करण्याच्या सूचना शहरातील शिवसैनिकांना दिल्या त्याचबरोबर विकासकामांच्या प्रमा आणून दिल्या जातील असे अभिवचन दिले. परतीच्या पावसाने झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे ज्या शेतकऱ्यांचे झाले नसतील त्यांचे पंचनामे करण्यासाठी शिवसैनिकांनी मदत केली पाहिजे असे सांगून आगामी सर्व निवडणुकीत भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन करताना आमचे शिवसेनेचे राज्यातील जेष्ठ नेते किंवा मुख्यमंत्री जिल्ह्यात आले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत मागे-पुढे मिरवून त्यांच्यासमोर लोटांगण घालीत असतात अशी खिल्ली उडवून शिवसेना कधीच कोणासमोर लोटांगण घालून झुकत नाही आणि झुकणारही नाही असा सणसणीत इशारा रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी दिला.
आपल्या मतदार संघात विकास कामे करून विकास कामांच्या जोरावर पक्षसंघटना वाढवणे महत्त्वाचे असते त्यासाठी आपल्या हक्काचा आमदार असणे गरजेचे असते पक्षनेतृत्वाने राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांसोबत केलेले महायुती जनमानसाच्या पचनी पडलेली नाही शिवसेना राज्याच्या सत्तेत एकत्र आहे. महायुती राज्य सरकारमधील आहे परंतु ही युती रायगड जिल्ह्यात नाही त्यामुळे तटकरे कुटुंबियांचे राजकारण फारसे मनावर घेणे गरजेचे नाही असे सांगून तटकरे हे फार चतुर माणूस आहेत, राजकारणात कोणाला कसे संपवायचे हे त्यांना चांगले माहीत आहे असा टोला श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी लगावला.
सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांना पालकमंत्री पद न देता एक वेळ निवडून आलेल्या व्यक्तीला पालकमंत्री केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमधे संतापाची लाट पसरली होती परंतु वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीत बिघाडी नको म्हणून शिवसैनिकांना शांत रहावे लागले असे सांगत शिवसैनिकांनो तुमच्यासमोर तगडे आव्हान आहे म्हणून गाफील राहू नका अन्यथा काँग्रेस पक्षाप्रमाणे आपले देखील परिस्थिती होईल असा गर्भित इशारा यावेळी युवासेना रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यांनी दिला त्याचबरोबर तालुक्यातील प्रशासकीय कामांमध्ये किंवा पालकमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांना जर निमंत्रित केले नाही तर यापुढे कार्यक्रम होऊन देणार नाही असा इशारा देऊन जर राष्ट्रवादी अंगावर आली तर आम्ही सुद्धा सोडणार नाही असा इशारा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दिला. आगामी काळात शिवसेनेचे माध्यमातून मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले.
शिवसेना तालुका प्रमुख महादेवराव पाटील यांनी सांगितले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र आहेत परंतु म्हसळा तालुक्यात शासकीय कार्यक्रमांचे साधे निमंत्रण सुद्धा दिले जात नाही. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी एकमेकांचे शत्रू होते पण आज मित्र आहोत याची जाणीव राष्ट्रवादीने ठेवली पाहिजे असे तालुका प्रमुख महादेव पाटील यांनी सांगितले.
आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची उघड नाराजी :-
यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना वेगवेगळ्या प्रकारे खंत व्यक्त केली. तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक बने यांनी सांगितले की श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेना दहा वर्ष मागे गेली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे विकास कामांच्या बाबतीत जनमानसात नाराजी असल्याचे बने यांनी उघडपणे सांगितले. तुरुंबाडी गावातील एका तरुण शिवसैनिकाने मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी पक्षाकडून विकास कामे होतात मग शिवसेनेकडून का होत नाहीत. आमच्या गावातील विकासकामांमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार होत असून हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्हाला शिवसेना नेत्यांच्या मदतीची गरज आहे असे सांगून सध्या तुरुंबाडी परिसरात दास कंपनी च्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न झाले पाहिजेत असे सूचित केले. पाभरे विभाग प्रमुख हेमंत नाक्ती यांनी सांगितले की विरोधी पक्षाचे लोक मुख्यमंत्र्यांच्या कामांचे श्रेय घेतात त्याचबरोबर तालुक्यातील पक्ष संघटनेतील गटबाजी दूर झाली पाहिजे असे मत तरुण शिवसैनिक हेमंत नाक्ती यांनी व्यक्त केले. माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी सांगितले कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात व त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या तालुक्यात फिरकले नाहीत अशी खंत व्यक्त करून तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व इतर अधिकारी वर्ग एकंदरीत प्रशासकीय यंत्रणा वेळोवेळी शिवसेनेला डावळत असून प्रशासनाचे काम निकृष्ट पद्धतीने चालले असून ते कोणाच्यातरी दबावाखाली काम करीत असल्याची शंका व्यक्त केली तसेच शिवसेना जागी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विकासकामे आणली पाहिजेत असे सूचित केले. ज्येष्ठ शिवसैनिक व माजी विरोधी पक्षनेते बालशेठ करडे यांनी श्रीवर्धन मतदारसंघाला कोणी वालीच राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित करून सध्याच्या परिस्थितीत शिवसैनिकांना मार्गदर्शक उरलेले नाही असे सांगून माजी आमदार अवधूत तटकरे या कार्यक्रमाला आले नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त करताना हे वागणे बरे नव्हे असा टोला लगावून शिवसेनेतील गटबाजी दूर झाली पाहिजे असे आवाहन केले. तालुका संपर्क प्रमुख गजानन शिंदे यांनी मातोश्रीवरील आदेश तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकांनी पाळले पाहिजेत,
पक्षांतर्गत गटबाजी, दुफळी पक्षात नको एकमेकांच्या तक्रारी नकोत असे सांगून माजी जिल्हाप्रमुख रवी मुंडे, माजी खासदार अनंत गीते यांच्याकडे दिलेले आमच्या तालुक्यातील विकास कामांचे अनेक निवेदने, पत्रे कचऱ्याच्या पेटीत गेले आहेत अशी जाहिर खंत व्यक्त करताना आगामी निवडणुका कशा लढणार असे सांगून माजी खासदार अनंत गीते यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली त्याच बरोबर सध्या मुख्यमंत्री शिवसेनेचे पण कामे कोणाची होतात हा प्रश्न उपस्थित केला. तालुका प्रमुख महादेव पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले तर उप तालुका प्रमुख तथा सरपंच राजाराम तिलटकर यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे आभार मानले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, युवासेना दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले, माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, श्रीवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर, ज्येष्ठ शिवसैनिक व माजी विरोधी पक्षनेते बाळशेठ करडे, श्रीवर्धन मतदारसंघ क्षेत्र संघटक रविंद्रड, तालुका प्रमुख महादेव पाटील, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, उप तालुका प्रमुख राजाराम तिलटकर, भाई कांबळे, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर, पाभरे विभाग प्रमुख हेमंत नाक्ती, सौरभ करडे, राहुल जैन, यांसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment