पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने पनवेल तालुक्यासाठी अतिरिक्त “अप्पर तहसिलदार” पद निर्मितीसाठी शासनाच्या कार्यवाहीस प्रारंभ
टीम म्हसळा लाईव्ह
वाढते नागरिकीकरण व लोकसंख्या वाढ यामुळे केंद्र व राज्य शासनाची धोरणे व योजना याची यशस्वीरित्या व गुणात्मकरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या तहसिलदार कार्यालय , पनवेल यांच्याकडील प्रशासकीय कामकाजामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे .
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, पळस्पे ते उरण राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे इत्यादी दळणवळणाच्या सुविधामुळे पनवेल तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात नागरिकीकरण होत आहे व त्यामुळे लोकसंख्येमध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामकाजामध्ये सुलभता, गुणात्मकता व यशस्वीतता स्थापित करण्यासाठी तहसिलदार कार्यालयाचे पुनर्रचन करुन नव्याने अतिरिक्त “ अप्पर तहसिलदार ” पद निर्माण करण्याची आवश्यकता अभ्यासून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे शासनाची मान्यता मिळण्यासाठी लेखी विनंती केली होती.
या विनंतीची तात्काळ दखल घेऊ शासनाने पनवेल येथे अपर तहसिलदार कार्यालय निर्मितीबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांना कळविले आहे. पनवेल तालुक्यातील मोठया प्रमाणात वाढणारे नागरिकीकरण व लोकसंख्या, यामुळे प्रशासकीय तसेच नागरी सोयीसुविधा वाढविण्याची भविष्यातील गरज याचा दूरदृष्टीने विचार करीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी हे पाऊल उचलले आहे,जे जिल्ह्याच्या दृष्टीने भविष्यात उपयुक्त ठरणार आहे.
Post a Comment