अत्युत्कृष्ट काम करणारे जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी हाेणार "पालकमंत्री प्रशासकीय पुरस्कार योजनेद्वारे" सन्मानित
जिल्हा प्रशासनातील चांगल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित व सन्मानित करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पुढाकार
टीम म्हसळा लाईव्ह
केंद्र व राज्य शासनाची धोरणे,योजना व कायदे याची यशस्वीरित्या व गुणात्मकरित्या अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित व सन्मानित करण्यासाठी राज्य शासनाकडून " राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा ) अभियान " व " उत्कृष्ट जिल्हाधिकारी सन्मान योजना" राबविली जाते. त्याचप्रमाणे अन्य विभागांमार्फतसुद्धा अशा स्वरुपाच्या सन्मान / पुरस्कार योजना सुरु आहेत. रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाचे योगदानही अत्यंत महत्वाचे आहे. जिल्ह्याच्या विकासाचा वेग अधिक गतिमान करणे , शासनाची धोरणे, योजना व कायदे यांची प्रभावी अंमलबजावणी करणे व पात्र लाभार्थ्यांना अनुज्ञेय लाभ देणे, या बाबींसाठी जिल्ह्यामध्ये विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित व सन्मानित करण्याच्या दृष्टीने " पालकमंत्री प्रशासकीय पुरस्कार योजना " सुरु करण्यासाठी विहित कार्यपद्धती , निकष व पुरस्काराचे स्वरुप निश्चित करण्याबाबत मसुदा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील प्रमुख विभागातील अधिकाऱ्यांची समिती स्थापित करावी, या समितीने केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कार योजनांचा सखोल अभ्यास करुन रायगड जिल्ह्यासाठी “ पालकमंत्री प्रशासकीय पुरस्कार योजना " सुरु करण्यासाठी प्रारुप मसुदा सात दिवसांमध्ये तयार करावा, जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी प्रारुप मसुदा तपासावा व आवश्यकतेनुसार त्यामध्ये सुधारणा करुन योजनेचा प्रारुप मसुदा पुढील सात दिवसात निश्चित करावा, अंतिम निश्चितीसाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड यांच्या स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल, योजना निश्चितीबाबतची कार्यवाही माहे ऑक्टोबर 2020 अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आखणी करावी, असे निर्देश पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या उपक्रमामुळे उत्कृष्ट काम करणार्या जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल व त्यांच्या चांगल्या कामाला शाबासकी मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वृद्धी होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment