सन २००५ संपून नवीन २००६ साल सुरू होऊन दोन- चार महिने झाले असतील... नसतील. एका भल्या पहाटे मालवणच्या ग्रामदैवतांचे मानकरी वसंतराव गावकर यांना जणू साक्षात्कार झाला आणि बिछान्यावर निद्रेच्या अधीन गेलेल्या वसंतरावांचे डोळे खाडकन उघडले. आजूबाजूला कोणी नव्हते. नुकतीच कुठे पहाट रुंझुमुंझु होत होती. पहाटेची पडलेली स्वप्ने खरी होतात, असे म्हणतात पण ते स्वप्न होते की साक्षात्कार ! वसंतरावांना नीट काही कळत नव्हते. पण एक गोष्ट खरी होती. उंच अशा डोंगरावर, डोंगर कसला सरळसोट कडाच तो, बाजूला खळाळत वाहणारा धबधबा... घनदाट जंगल आणि त्या जंगलात पुरातन अशा दगडी मंदिरात असलेली देवीची एक मूर्ती... होय तीच काळम्माई देवीची मूर्ती... चव्हाण गावकर घराण्याची कुलदेवता.. जणू वसंतरावांना सांगत होती. मालवण मध्ये माझी प्रतिष्ठापणा कर. वसंतरावांना सारे काही कळून चुकले. तोपर्यंत रविराजाची किरणे पृथ्वीवर पडू लागली होती. वसंतरावांनी सकाळ होताच आपल्या बांधवांना, सग्या सोयऱ्यांना साद घालून, निरोप देऊन बोलावून घेतले. पहाटेच्या सुमारास घडलेला प्रकार वसंतरावांनी सर्वांना सांगितला. आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. ते पाहून वसंतराव म्हणाले, "या आठवड्यात आपल्याला घराण्याच्या कुलदेवतेला भेटायचे आहे." होय तीच... काळम्माई देवी ! सह्याद्रीच्या पर्वत रांगात वास करणाऱ्या वाकीघोलच्या जंगलात तिच्या दर्शनाला जायचं आहे, ते सुद्धा कारागीर घेऊन. वसंतरावांनी ठामपणे सांगितलं. आणि मग सुरू झाला मालवण ते वाकीघोल असा प्रवास. यातूनच वाकीघोलच्या निभिड जंगलात असलेली काळम्माई देवी आपले रूप घेऊन मालवणच्या पुण्य भूमीत दाखल झाली. वायरी गावकरवाडीतील कुळाचाराच्या मंदिरात.. काळम्माई देवी भक्तांच्या सेवेसाठी विराजमान झाली. या घटनेला दहा बारा वर्षांचा काळ लोटला असेल परंतु एक गोष्ट खरी आहे, काळम्माईच्या आशीर्वादानेआणि ग्रामदैवते श्री देव रामेश्वर - नारायण, सातेरीच्या अधिपत्याखालील मालवण भूमीत सर्वकाही सुखनैव चालले आहे.
मालवण शहरातील वायरी गावकरवाड्यात सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आलेली काळम्मा देवी ही मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या सरवदे गावातील. पुराण कथेनुसार भगवती आणि काळम्मा या दोघी सवती रामलिंगाच्या बायका. एके दिवशी या दोघांचेही कडाक्याचे भांडण झाले. आणि भगवती देवीने वास्तव्य केले बागलवाडीत. तर रागाने काळम्माई गेली वाकीहोलच्या जंगलात. याच वाकीघोल हेळेवाडीच्या जंगलात ज्याठिकाणी धबधबा आहे, त्याठिकाणी काळम्माई देवी वास करून राहिली. आणि काळम्मा धरणाची जलदात्री झाली. तर याच देवीचे भक्त असणारे आणि शिवपूर्व काळापासून सरदार म्हणून मिरवणारे गावकर घराणे सुभा जिंकत जिंकत मालवणात आले आणि मालवणवासीय होऊन गेले. हे होत असतानाच मालवणात चव्हाण गावकर घराण्याची वस्ती वाढत गेली. आणि मग छात्रकुलोत्पन्न समाज कार्यरत झाला. मालवणच्या गावकरवाड्यात चव्हाण गावकऱ्यांचे एका लहानशा झोपडीवजा घरात कुळाचाराचे स्थान निर्माण झाले. खरतर श्रद्धा ही मानवी जीवनात फार मोठी शक्ती बनते आणि बनलेली शक्ती ही मूर्त अमूर्त गोष्टींवर श्रद्धा ठेवते. हे कुठल्या विशिष्ट समाजात घडत नाही, तर प्रत्येक मानवी जीवनात ही गोष्ट घडत असते. काहींच्या मते ती श्रद्धा असते तर काहींच्या मते अंधश्रद्धा असते. पण कधी कधी संकटसमयी हीच श्रद्धा उपयोगी पडते. आणि जीवन सुखकारक बनते. होय...! वायरी गावकर वाड्यात कुळाचाराच्या पाषाणावर श्रद्धा ठेवून गावकर मंडळी कार्यरत आहेत
वसंतरावांनी झालेला साक्षात्कार आपल्या गावकर मंडळींना सांगितला होताच त्यानंतर लागलीच रामकृष्ण गावकर, अशोक हडकर, उदय गावकर, सीताकांत गावकर आणि इतर मंडळींना घेऊन वसंतरावांनी वाकीघोल गाठले. वाकीघोल विषयीची माहिती सांगताना स्व. वसंतराव गावकर यांचे सुपुत्र हरीष गावकर हे भावुक होतात. पुस्तकात वर्णन केलेल्या स्वर्गापेक्षाही रम्य असा परिसर म्हणजे वाकीघोल आहे असे ते सांगतात. गावकरवाड्यातील या मंदिराची माहिती देताना हरिष गावकर, उदय गावकर, अशोक हडकर हे दहा बारा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत रममाण होतात. आणि सांगू लागतात, वाकीघोल कडे जाताना उंच असा उभा कडा लागतो. जेमतेम एक माणूस जाईल एवढीच वाट आहे. २००६ साली याठिकाणी जाताना आपल्या वडिलांनी कारागीर घेतला होता. काळम्माई देवीच्या मंदिरात पोहचल्यानंतर त्या कारागिराने चार पाच तासात देवीसमोर ठाण मांडीत तिचे चित्र रेखाटले. आपल्याला मालवणात अशाच प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावयाची आहे, असा निश्चय करून वसंतरावांसोबत आलेल्या त्या कारागिराने कागदावर देवीचे चित्र रेखाटले आणि एका अनामिक सुखाने वसंतरावांबरोबर गेलेली सर्व मंडळी सायंकाळी एखाद्या सराईताप्रमाणे कड्याची उतरण उतरू लागले. काळम्माई देवी आपल्या पाठीशी आहे. आपले काम फत्ते होणार या विश्वासाने सारे सुखावले होते. मालवणला आल्यानंतर कारवारचा तो कारागीर आपल्या घरी रवानाही झाला होता. दिवसामागून दिवस लोटले. चार पाच महिन्याचा काळ लोटला असेल आणि वाकीघोलच्या जंगलात सिंहावर आरूढ झालेल्या काळम्माई देवीची प्रतिकृती दगडात कोरली गेली होती आणि गावकर वाड्यात कुळाचाराच्या मंदिरात तिची स्थापनाही झाली. सुमारे अडीज फूट उंच असणारी ही मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात डमरू तर चौथ्या हातात जल वाटिका अशा रुपात मूर्ती आहे. या मंदिरासाठी वसंतराव गावकर यांनी आपल्या मालकीची दोन गुंठे जमीन विना मोबदला दिली आणि त्या जमिनीत काळम्माई देवीचे मंदिर उभारले गेले.
दरवर्षी या मंदिरात नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टनसिंग आणि शासन नियमांना अनुसरून अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा होत आहे. गावकर घराण्याची कुलदेवता असणाऱ्या श्री काळम्माई देवीच्या आशीर्वादाने सारे काही सुखमय चालले आहे. दुष्टांचे पारिपत्य करणारी काळम्माई देवी कोरोनाचाही समूळ नायनाट करेल अशी श्रद्धा भाविक जागविताना दिसत आहेत.
प्रफुल्ल देसाई , मालवण - 9422584759
Post a Comment