फोटो- राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त बालविकास प्रकल्प कार्यालयातर्फे बेटी पढाव, बेटी बचाव अभियान कार्यक्रम
◆ महात्मा गांधी जयंती निमित्त म्हसळ्यात बेटी बचाव, बेटी पढाव कार्यक्रम संपन्न
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत समिती आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय म्हसळा यांच्या विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे बेटी बचाव, बेटी पढाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी तहसिलदार शरद गोसावी, उपसभापती मधुकर गायकर, माजी सभापती छाया म्हात्रे
गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, बालविकासप्रकल्प अधिकारी तथा प्र.गटशिक्षणाधिकारी व्यंकट तरवडे, वरिष्ठ विस्तार अधिकारी संतोष शेडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे, विस्तार अधिकारी गायकवाड, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका रेणुका पाटील, मंडळ अधिकारी राम करचे, दिपक पाटिल आदि मान्यवर यांसह अंगणवाडी सेविका, मदतनीस व कर्मचारी उपस्थित होते.
बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यांनी प्रास्ताविक करताना एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यात राबविण्यात आलेल्या सर्व योजनांची माहिती देऊन बेटी पढाव, बेटी बचाव उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
तहसीलदार शरद गोसावी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज समाजात सुसंस्कारित पिढी घडविण्यात महिलांचे योगदान मोलाचे असते असे सांगून मुली व महिला यांच्या विषयी प्रत्येक पुरुषांनी आदर बाळगला पाहिजे तसेच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी व त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार शरद गोसावी यांनी यावेळी केले.
गटविकासअधिकारी वाय.एम.प्रभे यांनी सांगितले की जीवनात मुलीला अनन्य साधारण महत्व आहे,कारण स्त्री हीच सामाजातील प्रत्येक भूमिका यशस्वी पणे पार पाडते. आजच्या तुलनेत विचार केला तर मुलीचा जन्मदर हा हजारी ९१८ आहे, हि बाब अत्यंत चिंताजनक असून ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढल्यास मुलांची लग्न कशी होतील हा हि प्रश्न निर्माण होणार असून कोणीही गर्भ चाचणी न करता जे अपत्य जन्माला येईल मग तो मुलगा असो अगर मुलगी त्याचा आनंदाने स्वीकार करणे अत्यावश्यक असल्याचेही गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी सांगितले. विशेष म्हणजे आज स्त्री कुठेही कमी पडत नाही, पुरुषांच्या बरोबरीने किंबहून त्यापेक्षाही काकणभर सरस भूमिका स्त्री कडून बजावली जात आहे. त्याच प्रमाणे कौटुंबिक विचार केला तर मुलांपेक्षा मुलगीच कुटुंबाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवीत असून सर्व समाजाला मुलीचे महत्व पटविणे हि आपणां सर्वांची जबाबदारी असल्याचेही प्रभे यांनी सांगितले.
माजी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती मधुकर गायकर, तालुकाआरोग्य अधिकारी गणेश कांबळे,
वरिष्ठ विस्तार अधिकारी संतोष शेडगे, आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून आपापल्या भूमिकेतून मुलींचे व महिलांचे महत्व विशद केले.
कार्यक्रमाचे निमित्ताने मुलीचे महत्व पटविणारी सुंदर आणि प्रभावी एकांकिका बालविकास प्रकल्प कार्यालयातर्फे सादर करण्यात आली. निबंध आणि चित्रकला स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या स्पर्धकांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
Post a Comment