टीम म्हसळा लाईव्ह
लायन्स क्लब आॅफ पोयनाडच्या वतीने २ आॅक्टोबर ते ९ आॅक्टोबर या काळात सेवासप्ताह विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. या सेवा सप्ताहाचा प्रारंभ चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हाॅस्पिटलमध्ये करण्यात आला.
लायन्स क्लब आॅफ पोयनाडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवासप्ताहात पोयनाड, मांडवा, अलिबाग, लिओ आणि डायमंड या पाचही लायन्स क्लबने संयुक्तपणे लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हास्पिटलमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित केले होते. यावेळी तिरळेपणा, मोतीबिंदू आदींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तसेच पोयनाड लायन्स क्लबने वडवली परिसरात ठीकठिकाणी वृक्षारोपण केले. पोयनाड पोलिस स्टेशन, रिक्षास्टँड, ग्रामपंचायत, बाजारपेठ व आजूबाजूच्या परिसरात आॅक्सीमीटर, सॅनिटायझर, स्टीमर, फेसमास्क आदी कोरोना प्रतिबंधाचे सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले. बांधण येथील संपर्क बालग्राम येथे एक महिन्याचे किराणा सामान वाटप करण्यात आले.
संतोषी माता मंदिरात आरोग्य तपासणी शिबीरही आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हिमोग्लोबीन, बीपी, शुगर आदींची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा १२५ रुग्णांनी फायदा घेतला. भाकरवड येथील कॅन्सररुग्ण बालिकेस उपचारासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश तिला देण्यात आला, तसेच फळ आणि बिस्कीट वाटप केले. अखेरच्या दिवशी बांधण येथील संपर्क बालग्राम येथे शिवणयंत्र, कपडे सुकविण्याचे स्टँड, तसेच कपडे वाटप करण्यात आले.
या सेवा सप्ताहास रिजन चेअरमन प्रदीप सिनकर यांचे मार्गदर्शन राहिले. तसेच अध्यक्ष मनोहर चवरकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रगती सिनकर, खजिनदार विकास पाटील, माजी अध्यक्ष मनीष अग्रवाल, अरविंद अग्रवाल, कौस्तुभ जोशी, महेंद्र पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, कुशल अग्रवाल, ललित जैन, मनोज जैन, दिलीप गाटे, सतीश पाटील, गुरुनाथ पाटील आदींनी या सर्व उपक्रमांसाठी मेहनत घेतली.
Post a Comment