95 वर्षीय निराधार आई व तिच्या विकलांग मुलीचे म्हसळा पोलिसांनी स्विकारले पालकत्व
● पोलिसांच्या कामगिरीचे होत आहे कौतुक
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या महारोगाने थैमान घातले असल्यामुळे मार्च महिन्यापासून ते आज तगायत प्रशासकीय कर्मचारी हे या संकटावर मात करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामध्ये राज्य पोलीस दल यांच्यावर तर फार मोठी जबाबदारी असून पोलीस कर्मचारी यांना आपल्या कुटुंबाकडे सुद्धा लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यातूनच म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.धनंजय पोरे व पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शामराव कराडे, समर्थ सांगले, संतोष चव्हाण, सुर्यकांत जाधव, विजय फोपसे हे कोरोना काळामध्ये संपूर्ण तालुक्यात पेट्रोलिंग करीत असताना तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा उत्तम प्रकारे प्रयत्न करीत आहेत. कोरोना महामारीशी लढा देत असतानाच लॉकडाउन कालावधीमध्ये दुर्दैवाने 03 जून रोजी रायगड जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाने हल्ला केला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले गोरगरीब जनतेचे फार मोठे नुकसान झाले. संपूर्ण म्हसळा तालुक्यातील गरीब गरजू जनतेला रायगड पोलीस दलाकडून आलेल्या अत्यावश्यक वस्तू, धान्य, घरांचे पत्रे, ताडपत्री यांचे एक ना अनेक वेळेला म्हसळा पोलीस स्टेशन यांच्याकडून वाटप करण्यात आले. म्हसळा तालुक्यातील देवघर बौद्धवाडी येथील निराधार 95 वर्षे महिला हिराबाई साळवी व त्यांची पूर्णतः अपंग व मूकबधिर असलेली मुलगी अलका साळवी या दोघींचे पालन-पोषण करण्यासाठी कोणीही नाही. अशा निराधार कुटुंबाची म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांना माहिती मिळाली त्यावेळी पोरे यांनी कोणताही वेळ न लावता थेट या कुटुंबाकडे धाव घेतली या कुटुंबाला भेट देऊन त्यांची विचारपूस व परिस्थितीची जाणीव करून घेऊन त्या कुटुंबाचे सर्वस्व पालकत्त्वाची जबाबदारी घेऊन त्यांना जाणवणाऱ्या समस्यांचे निराकारण करीत आहेत. निसर्ग चक्रीवादळात या निराधार मायलेकींचे संपूर्ण घरदार उद्ध्वस्त झाले आहे. जवळपासचे असलेले सर्व अन्न धान्य पावसात भिजून खराब झाले. पोलिसांनी या निराधार मायलेकीचे सर्वप्रथम पावसापासून संरक्षण करण्यासाठी पत्रे व ताडपत्री यांची व्यवस्था करून दिली.
त्यानंतर लागलीच संसार उपयोगी अन्नधान्य वस्तू, तांदूळ, तेल, पीठ, डाळ, मसाला, दैनंदिन सर्वच अगदी पेस्ट, टूथब्रश, बिस्किट पुडा पासून वस्तू देऊन उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. वास्तविक पाहता लॉकडाउन झाल्यापासून पोलीस या मायलेकींना अन्नधान्य पुरवत आहेत. तसेच देवघर बौद्धवाडी पासून अत्यावश्यक कामासाठी ये - जा करण्यासाठी दोन रिक्षाचालक त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर ठेवले आहेत. निराधार कुटुंबातील 95 वर्षीय हिराबाई साळवी यांच्या डोळ्याची तपासणी अलिबाग येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रीती प्रधान यांच्याकडून करून घेतली व पुढील उपचार चालू असून त्यांची 49 वर्षीय मुलगी अलका हिला सुद्धा एका डोळ्याने दिसत नसल्याने तिच्यावर सुद्धा आरोग्य उपचार सुरू असून लागणारे संपूर्ण उपचाराचा खर्च पोलीस निरीक्षक धनंजय पोरे करीत आहेत. अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन व सामाजिक बांधिलकीची जपणूक म्हसळा पोलिस खात्याकडून होत असल्याने तालुक्यातील जनतेकडून पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस ठाण्यातील सहकारी पोलीस कर्मचारी वर्ग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment