श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन कृषी विभागाच्यावतीने सुपारी संशोधन केंद्रात रान भाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर महोत्सवामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील विविध आदिवासी बांधवानी त्यांच्या सभोवताली निसर्गतः पिकणाऱ्या भाज्या महोत्सवामध्ये मांडल्या होत्या. सदर भाज्यांच्या निर्मितीमध्ये रासायनिक घटकांचा वापर करण्यात आलेला नाही असे आदिवासी बांधवानी सांगितले. या भाज्यांमध्ये केना, करटोली,
: पेरी, आळु, वड्याची पाने, भारंगी भाजी, काळा आळु, कड्याच्या शेंगा, आळु, शेवगा पाला, कुवली, पाथरी, दिंडा, सुरण, आकुड, कवळा, टाकळा, खवणी इत्यादीचा समावेश करण्यात आला होता. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या स्वरूपात संकरित पिकांची निर्मिती करण्यात येते. अवाजवी पिकाच्या उत्पन्नासाठी मोठ्या स्वरूपात रासायनिक घटकांचा वापर आजमितीस केला जात आहे. त्याचे परिणाम स्वरूप संबंधित पिकाचे सेवन करणाऱ्या घटकांवर होत आहे. बदलत्या जीवनशैलीत मधुमेह, रक्तदाब, व इतर तत्सम आजार यांची संख्या वाढलेली आहे. अशा प्रसंगी निसर्गतः निर्माण झालेल्या भाज्यांचे सेवन केल्यास आरोग्य सुदृढ राहू शकते. असे कृषी अधिकारी शिवाजी भांडवलकर यांनी सांगितले. सदर महोत्सवाचे उद्घाटन सभापती बाबुराव चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ, प्रभारी अधिकारी सुपारी संशोधन केंद्र सलीम महालदार, उदय बापट व सयाजी इंगळे उपस्थित होते.
रानभाज्या महोत्सवाद्वारे शहरातील सर्वसामान्य व्यक्तींना रानभाज्यांचे महत्त्व समजले. महोत्सव प्रसंगी कृषी विभागाकडून प्रत्येक रानभाजीचे वैशिष्ट्य लिहिलेले फलक लावण्यात आले होते. कृषी विभागाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. ( बाबुराव चोरगे सभापती पंचायत समिती श्रीवर्धन)
निसर्गतः निर्माण होणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. मी स्वतः कवळा, खवणी, अळू यांचे सेवन करतो. रानभाज्या ह्या आरोग्यदायक आहेत.... ( उदय बापट सरपंच दिवेआगर )
Post a Comment