दोन महिन्यांनंतर ही निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत


दोन महिने होऊन गेले तरीही निसर्ग चक्री वादळालातील नुकसानग्रस्त अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या निसर्ग चक्री वादळाला सोमवारी दोन महीने पूर्ण झाले असून या वादळामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप १००% भरपाई मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये सरकार विरोधात रोष वाढत आहे.
श्रीवर्धन केंद्रबिंदू असणार्‍या निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तीन तालुक्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या वादळात परिसरातील ८०% नागरिकांचे संपूर्ण घर, घरावरील कौले, पत्रे उडून गेली होती. अनेक शेतकरी, बागायतदारांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाउनच्या काळात हातामध्ये कामधंदा नसताना देखील, लाखो रुपयांचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. असे असताना देखील शासनाकडून तुटपुंजी मदत (लाखो रूपयांचा नुकसानाला चौदा हजार रुपये) मिळाली असून काही नुकसानग्रस्त दोन महिन्यांनंतर देखील अद्याप मदतीपासून वंचित आहेत. म्हसळा नगरपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळामुळे रस्त्या लगत पडलेले झाडे व कचरा अद्याप उचलला गेला नसून, या कचर्‍यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई देण्याबाबत शासन अद्याप उदासीन असल्याने बागायतदार व नुकसान ग्रस्तांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही शासन तुटपुंजी मदत देत आहे आणि ही मदत नागरिकांच्या बँक खात्यात वेळेत जमा होत नाही. याबाबत महसूल विभागाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्ही शासनाच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हसळा शाखेच्या खात्यात मंजूर रक्कम वर्ग केलेली आहे असे सांगण्यात आले आहे.


"म्हसळा तालुक्यातील देवघर कोंड येथे संपूर्ण गावाचे नुकसान झाले आहे. मात्र शासनाने या नुकसानाची थट्टा मांडली असून काही ग्रामस्थांना एक हजार, दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे."
मनोज गिजे नुकसान ग्रस्त ग्रामस्थ 


आमदार अनिकेत तटकरेंचे बँक व्यवस्थापणावर ताशेरे 

    कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र लिहून बँक व्यवस्थापणेवर ताशेरे ओढले आहेत. चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या बहुतांश नुकसान ग्रस्तांना बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे शासनाने दिलेल्या मदतीपासून वंचित आहेत. बँक व्यवस्थापणावर जिल्हा प्रशासनाने तत्काल कारवाई करण्याची मागणी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा