श्रीवर्धन मधील गोकुळाष्टमी वर कोरोनाचे सावट ; अनेक वर्षाची परंपरा होणार खंडित


श्रीवर्धन मधील गोकुळाष्टमी वर कोरोनाचे सावट

 अनेक वर्षाची परंपरा होणार खंडित

 कोरोना  पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

 श्रीवर्धन बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची जन्मभूमी आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी व परंपरांचे पालन हे श्रीवर्धन चे वैशिष्ट्य मानले जाते. श्रीवर्धन मधील गोकुळाष्टमी हा एक आगळा वेगळा व परंपरा प्रिय उत्सव आहे.  मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अनेक वर्षाची गोकुळाष्टमी ची परंपरा चालू वर्षी खंडित होणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते. पारंपारिक पेहराव, पारंपरिक वाद्य, मित्र सख्याच्या हातात हात गुंफत, तरुणाई दिवसभर श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करत असते. पारंपरिक वाद्याच्या संगीतावर अबाल वृद्ध, व तरुणाई  नृत्य करून  आनंद साजरा करत असते. श्रीवर्धन शहराला निसर्गाचे वरदान प्राप्त आहे. चौफेर अथांग समुद्र, विपुल वनसंपदा, कौलारू घरे, विविध जाती धर्माचे लोक आपल्या रूढी  - परंपरा आनंदाने मोठ्या जोशात जोपासत आहेत .  आला रे आला गोविंदा आला हे गीत गात तरुणाई नृत्य करत शहरातील विविध प्रभागात फिरते. आजमितीस  श्रीवर्धन तालुक्या ची लोकसंख्या   ८० हजाराच्या जवळपास आहे. व शहराचा विचार करता  नगरपरिषदेच्या हद्दीत अंदाजे २० हजार लोकांचे वास्तव्य आहे.  श्रीवर्धन मधील प्रत्येक प्रभागास,  आळीस  पाखाडी असे संबोधले जाते. शहरातील प्रत्येक पाखाडी प्रमुख ही जबाबदारीचे व कर्तव्यदक्ष तिचे पद मानले जाते. पाखाडीत होणाऱ्या प्रत्येक उत्सवाचे आयोजन नियोजन याची सर्वस्वी जबाबदारी पाखाडी अध्यक्षाच्या मार्फत समिती करते. गोकुळाष्टमीच्या अगोदर जवळपास प्रत्येक पाखाडी मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे, किंबहुना सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. सदर प्रसंगी शैक्षणिक,  सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला जातो. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सर्व कार्यक्रम संपन्न होणे शक्य नाही. पाखाडीत बोलले गेलेले नवस गोकुळाष्टमीच्या दिवशी पूर्ण केले जातात. प्रत्येका पाखाडीतुन स्वतंत्र दावण निघते. दावण म्हणजे पाखाडीतील तरुण , लहान मुले मानवी साखळी निर्माण करतात. एकमेकांच्या हातांची गुंफण करत श्रीकृष्णाचा जयघोष करत प्रत्येक पाखाडीतील  लोक संपूर्ण गावभर भ्रमंती करतात. श्रीवर्धन गावातील प्रत्येक मंदिर, प्रत्येक पाखाडीला भेट दिली जाते.  दावण हा मैत्री, एकोपा, प्रेम, आपुलकी, स्नेह याचे प्रतीक मानले जाते. सदरचा उत्सव निरंतर दोन दिवस चालतो. श्रीकृष्ण जन्म रात्री झाल्यानंतर दुसरा सबंध दिवस तरुणाईने नृत्य करते. शहराच्या विविध भागात विविध मंडळांकडून लावण्यात आलेल्या दहीहंडीला फोडण्याचे काम गोविंदा पथके करतात. प्रत्येक वर्षी ग्रामदेवता सोमजाई मंदिराच्या प्रांगणात भव्य दहीहंडी बांधली जाते मात्र यावर्षी कोरोना चे सावट असल्याकारणाने दहीहंडी होण्याची शक्यता नाही. नियमानुसार पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती एका जाग्यावरती उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे श्रीवर्धन मधील सर्वसामान्य व्यक्तीला पारंपरिक पद्धतीने मित्रांसोबत हसत खेळत गोविंदा साजरा करता येणार नाही. श्रीवर्धन मधील गोकुळाष्टमी उत्सवाचे औचित्य साधत विद्यमान खासदार सुनील तटकरे प्रत्येक वर्षी श्रीवर्धन ला येतात.तसेच   श्रीवर्धन तालुक्यातील  नोकरी , व्यवसाय, शिक्षण या विविध कारणांसाठी बाहेर जिल्ह्यात असलेले लोक आवर्जून गोविंदा उत्सवासाठी श्रीवर्धनला येतात. मात्र यावर्षी वाहतूक, बदललेले हवामान, अवाजवी पडणारा पाऊस व कोरोना विषाणू या सर्व बाबींचा परिणाम गोविंदा उत्सवावर झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.  उपविभागीय पोलिस अधीक्षक बाबुराव पवार यांनी श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील शांतता कमिटीसमोर प्रशासनाची बाजू मांडलेली आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शांततामय  वातावरणामध्ये गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यासाठी श्रीवर्धन मधील जनता सज्ज झालेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा