श्रीवर्धन मध्ये महसूल दिवस साजरा ; 54 व्यक्तींची कोव्हीड अँटीजन टेस्ट



 संकटात कर्मचाऱ्यांची मेहनत कौतुकास्पद.... अमित शेडगे (प्रांताधिकारी श्रीवर्धन  )

श्रीवर्धन प्रतिनिधी :संतोष सापते 

  जनतेच्या संकटाच्या काळात महसूल कर्मचाऱ्यांनी केलेलं कार्य निर्णायक व महत्वाचे आहे. कोरोना व चक्रीवादळ ही दोन्ही संकटे  समाजाला धोकादायक ठरली आहेत . समाजातील सर्वसामान्य व्यक्तीचे आरोग्य  व जीवित धोक्यात आले असताना त्याला प्रशासकीय मदत पोहच करण्याचे काम महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केले आहे. संकटात काम करणाऱ्या लोकांचे मेहनत कौतुकास्पद आहे  असे  प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी सांगितले . श्रीवर्धन प्रांत कार्यालयाच्या सभागृहात महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर, नायब तहसीलदार   रामभाऊ गिरी, तलाठी अर्जुन भगत, संतोष शेट्टे  व महसूल प्रशासनात कार्यरत असणारे अनेक कर्मचारी उपस्थित होते. महसूल दिनाच्या प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही संकटामध्ये सर्वच प्रशासकीय यंत्रणेने अतिशय चांगले काम केलेले  आहे. शासनाने सर्वसामान्य व्यक्तीला दिलेली मदत त्याच्यापर्यंत पोहोच  करण्यासाठी आपण सर्वांनी अथक परिश्रम केलेले आहेत. शासना कडून  चक्रीवादळाचा संदर्भात आलेल्या आदेशानुसार आपण काम  केलेले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष करत आपले दायित्व आपले कर्तव्य पार पाडले आहे. महसूल दिनाची  परंपरा फार पूर्वीपासून आहे. दिवसेंदिवस या परंपरेमध्ये अमुलाग्र बदल घडल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. महसूल दिन साजरा करण्या संदर्भात वेगवेगळी परिपत्रके अनेक वर्षापासून शासन निर्गमित करत आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून आज आपण आपल्या महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची अँटीजेन कोव्हीड  टेस्ट करत आहोत. लवकरच आपण रक्तदान शिबिराचे आयोजन करणार आहोत. चक्रीवादळात एक महिना  आपणा सर्वांचे फार मोठ्या स्वरूपात धावपळ झालेली आहे.  दररोज तालुक्यातील शेकडो लोक आपल्या कार्यालयात भेट देतात त्यांच्या अडचणी आपल्यासमोर मांडतात त्याचे निराकरण करणे हे आपले दायित्व आहे त्यानुसार आपण सर्वजण नियमित आपले काम करत आहात. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाने दिलेला मदत निधी पोहोचवण्याचं दायित्व आपणा सर्वांचा आहे त्यानुसार आपण सर्वांनी काम केल आहे व पुढे करत राहू अशी मी आशा व्यक्त करतो असे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी सांगितले. महसूल दिनाच्या प्रसंगी प्रांत अधिकारी यांच्या हस्ते महसूल विभागातील विविध कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशानुसार श्रीवर्धन रुग्णालयातील डॉक्टर मयुर हेगडे, माधुरी दीक्षित व  डॉक्टर सलीम डालाईत यांच्या टीम ने सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांची कोव्हीड ऍन्टीजन  टेस्ट  व नेत्र चाचणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा