मकरंद जाधव / ऋषीकेश ओझा
परमेश्वरला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे निसर्गसुंदर कोकणची रम्य भुमी...एका बाजुला अथांग सिंधुसागर आणि दुसऱ्या बाजुला खडा पहारा देणारा काळ्या भिन्न कातळाचा सह्याद्री यामध्ये असणाऱ्या निसर्गसौंदर्याचे लेणे ल्यायलेला सुंदर प्रदेश म्हणजे रम्यभुमी कोकण आणि याच कोकणला ३ जुन रोजी आलेल्या महाविनाशकारी निसर्ग चक्रीवादळाची दृष्ट लागली.हे चक्रीवादळ निसर्ग सुंदर कोकण किनारपट्टीला पार उध्वस्त करुनच शांत झाले.या वादळाची आगावु सुचना हवामान विभागाकडुन आधिच देण्यात आली होती.त्यामुळे मुंबईसह रायगड रत्नागिरी व पालघरच्या संपुर्ण किनारपट्टीला प्रशासनाने आधीच सतर्क केले होते.सकाळी साधारण १० वाजून गेले आणि सुरु झाले निसर्गाचे भयाण तांडव आणि या भयाण तांडवाने काही क्षणातच रायगड रत्नागिरीसह संपुर्ण कोकणकिनारपट्टीवर आपल्या विनाशकारी ताकदीने कोकणी माणसाचे कधीही भरुन न येणारे नुकसान केले.या महाभयंकर चक्रीवादळात जी गावे नुकसानग्रस्त झाली त्यामध्ये रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग,मिनी गोवा म्हणुन प्रसिध्द असलेले मुरुड जंजीरा,दक्षिण काशी हरिहरेश्वर,पेशव्यांचे जन्मस्थान श्रीवर्धन आणि सुवर्ण गणेशाच्या पदस्पर्शाने पावन झालेले दिवेआगर या श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांबरोबरच तालुक्यातील छोटी मोठी सर्व गावे निसर्ग चक्रीवादळाच्या भीषण तांडवाने उध्वस्त झाली. वादळाबरोबरच सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाने संपूर्ण किनारपट्टीला झोडपून काढले.दोन तीन तासा नंतर वादळ पुढे सरकत गेले पण या वादळाच्या भीषण तांडवाने कोकण किनारपट्टीला वसलेल्या गावांचे अतोनात नुकसान केले.या वादळाचा सर्वाधिक फटका बसला तो संपुर्ण रायगड जिल्ह्याला. रायगडमधील सर्व गावांचे प्रचंड नुकसान झाले.आयुष्यभर अपार मेहनतीने वाढवलेल्या व उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या नारळ, सुपारी,आंबा काजुच्या बागा क्षणात भुईसपाट झाल्या. राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले.वादळाने असंख्य घरांची छप्परे उडाली क्षणात होत्याचे नव्हते झाले.संसार उघड्यावर पडले विद्युत यंत्रणा उध्वस्त झाली.संपर्क यंत्रणा ठप्प झाली रस्त्यावर झाडे कोसळून मदतीचे सर्व मार्गही बंद झाले.जीव फक्त वाचले हिच त्या परमेश्वराची मेहरबानी.त्यातच महाभयंकर कोरोना गावागावात धडका देउ लागला. त्यामुळे "भय इथले संपत नाही" याची विदारक सत्यता पटु लागली.
कोकणची लाल माती जगविण्याचे स्वप्न उराशी बाळगत येथील फळ बागायती,पर्यटन व्यवसाय आणि मासेमारी यांतून रोजगाराची निर्मिती करणाऱ्या कोकणवासीयांच्या स्वप्नांना 'निसर्ग' वादळाने पुरते बेचिराख केले.या उध्वस्ततेची तुलना आर्थिक निकषाच्या कोणत्याही तराजूत तोलता येणार नाही अपार मेहनतीने उभ्या राहिलेल्या कोकणच्या या नारळ-सुपारी-आंबा-काजू बागायती पूर्णपणे बेचिराख झाल्या.कोरोनामुळे शहरातील नोकरी व्यवसाय अडचणीत आल्याने आपल्याच गावात स्थिरावून बागायती आणि पर्यटन उद्योगांतील उभरत्या संधीवर आपल्या नवसंकल्पनांचे आराखडे रचणाऱ्या व व्यवसायाची नवी स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांच्या भावी आयुष्याचे स्वप्नही उद्ध्वस्त झाले आहे.ज्या निसर्गाने या गावांना ओळख दिली त्याच "निसर्ग" ने या सुंदर गावांची वाताहत केली.आज आपत्ती येऊन एक महीना उलटुन गेला आहे.प्रशासन मदत राबवायचा प्रयत्न करीत आहे.पण पाऊस आणि खूप मोठ्या प्रमाणावर विजेचे पडलेले खांब त्यामुळे खंडीत झालेला विद्युत पुरवठा,ठप्प झालेली संपर्क यंत्रणा यामुळे त्यांच्याही मदतीला वेग येत नाहीये.तरीसुध्दा प्रशासकीय यंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत आहे.वादळामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.फळबागांचे,शेतीचे किती नुकसान झाले यासाठी गावागावांत पंचनामे सुरु आहेत.ही मदत तर होतेय आहे पण त्याचबरोबर उध्वस्त झालेल्या फळबागांची नव्याने उभारणी करावी लागणार आहे.ही झाडे कोकणच्या मातीत पुन्हा उभी राहतीलही पण आता अतिवृष्टी,चक्रीवादळ अशा नैसर्गिक संकटांचा धोका लक्षात घेऊनच कोकण कृषी विद्यापीठाच्या साहाय्याने या बागांची पुन्हा नव्याने आखणी करावी लागेल.या आपत्ती मुळे घरादारा सोबतच कोकणची ओळख व सौंदर्य असणाऱ्या नारळ,सुपारी,आंबा, काजुच्या बागा व इतर फळझाडे उध्वस्त झाली आहेत. उभ्या हयातीत आपल्या शेत शिवाराचे कितीही नुकसान झालं तरीही आत्महत्या न करता व शासनाकडुन कोणत्याही मदतीची अपेक्षा न करणारा "निसर्गग्रस्त"कोकणी माणुस स्वतःला सावरुन जगण्यासाठी संघर्ष करीत आहे.मदत येवो ना येवो आपला संसार पुन्हा उभा करावाच लागणार यासाठी सर्व दुःख बाजुला ठेउन कामाला लागला आहे.घरावर छत टाकण्यासाठी पत्रे किंवा प्लास्टिक कापड घ्यावे तर पत्रे उपलब्ध नाहीत आणि आहेत तर ते घ्यायला पुरेसे पैसे नाहीत.घरात लाईट नाही त्यामुळे मेणबत्तीच्या उजेडात रात्र काढावी लागतेय,मोटर बंद असल्याने विहीरीचे पाणी चढवता येत नाहीये.मोबाईल बंद असल्याने कुणाला संपर्क करता येत नाही.आला दिवस ढकलत या संकटातून बाहेर पडणे याशिवाय पर्याय उरला नाही.पण माझा कोकणी बांधव मागे हटणार नाही फणस जसा चिवट नारळ जसा वरुन कडक तसा हा कोकणी माणूस तेवढाच मनाने भक्कम आणि काटक आहे.तो सर्व संकटं पार करुन पुन्हा आपले व गावाचे वैभव उभे करेल यात शंका नाही.ज्या पर्यटकांनी या गावांना भरभरून प्रेम," " आपुलकी देउन आपलसं केल आज त्याच पर्यटकांनी जर या गावांना मदतीचा हात देवून पुन्हा गावच्या उभारणीस हातभार लावण्यासाठी थोडाफार जरी प्रयत्न केला तरी या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाचे मनोबल वाढण्यास मदत होइल.कोरोना महामारीच्या विश्व संकटामुळे यावर्षी आधीच पर्यटन व्यवसाय धोक्यात आलेला होता त्यात भरीस हे नैसर्गिक संकट कोसळल्याने कोकणी माणसाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून पडले असुन यामुळे संपुर्ण कोकण किनारपट्टीला विस पंचविस वर्षे मागे नेउन ठेवले आहे.या भयंकर चक्रीवादळामुळे निसर्गाचे एक भयंकर रुप पाहायला मिळाले पण आता इथले लोक या धक्क्यातूनही सावरले आहेत.पुन्हा नव्या उमेदीने जगणं सुरू झाले आहे.पडलेली घरे आता पुन्हा शाकारली जात आहेत, माणसे उभारी घेत आहेत.उद्ध्वस्त झालेल्या बागांमध्येही पहिल्या पावसाने नवे अंकुरही फुटले आहेत. परंतु कोकणच्या नवनिर्मितीचे नियोजन करताना सर्वच जबाबदारी शासनावर न टाकता साऱ्यांनी मिळुन शासनाबरोबरच उभा महाराष्ट्र कोकणच्या मागे सह्याद्रीसारखा उभा राहीला तर लवकरच यातून हि गावं सावरून पुन्हा उभे राहुन त्यांना गतवैभव प्राप्त करुन देइल व पर्यटकांनी पुन्हा नक्कीच गजबजतील.
वादळाचे रौद्ररुप काही तासात संपलं पण त्याचे परिणाम मात्र दिर्घकाळ मागे राहणार आहेत.
Post a Comment