माहिती संकलन - हेमंत भाऊ पयेर,
बी.एस.सी. बी.पी.एड. एम.पी.एड.(सेट)
लगोरी हा भारतासह आशियाई देशांमध्ये लोकप्रिय असा पारंपरिक खेळ आहे. भारताच्या विविध राज्यांसह देश विदेशात वेगवेगळया नावाने लगोरी खेळ खेळला जातो. लगोऱ्या, चेंडू एवढेच साहित्य, साधे सोपे नियम व छोटेसे मैदान हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.लगोरी खेळाला देश विदेशात विविध नावाने ओळखले जाते यामध्ये भारत- लागोरी,कॅनडा - टीलो,पाकिस्तान - पिठो / पिट्टू / पिठू गरम,भूतान - सात दगड,युगांडा – सेव्हन स्टोन ,नेपाळ - सात तिलो,तुर्की- सेव्हन टाइल , बांगलादेश – सात चरा, अफगाणिस्तान – सॅनट्रकोन,श्रीलंका - लागोरी,सौदी अरेबिया आणि इराण – हफ़्त सांग, पण आता हा खेळ जगभरात “लागोरी” म्हणून ओळखला जातो.हा खेळ खालील प्रमाणे भारतातही वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो: -१) महाराष्ट्र-लागोरी,लगो-या,हैदराबाद – लिंगोचा,तामिळनाडू - लिंगोरच्या, नागोल्चू, राजस्थान- सीतोलिया, कर्नाटक - लागोरी किंवा लगुरी, केरळ- डब्बा काली, तुंग, चट्टी, तमिळनाडू - एझू कल्लू, हरियाणा आणि पंजाब – पिठ्ठू,राजस्थान- सीतोलिया,आंध्र प्रदेश-येडू पेंकुलता, गुजरात- सातोदियू व डिकोरी, १२) आसाम – सतगुती. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगोऱ्या एकावर एक ठेवणे व त्या चेंडूने विस्कळीत करणे होय .लगोरी खेळ मैदानावर तसेच इनडोर खेळला जातो.
खेळाचा इतिहास
भगवान श्रीकृष्ण व त्यांचे साथीदार असलेल्या गोपाळांनी लगोरी खेळ खेळल्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आढळत असल्याने या मनोरंजक खेळाबाबत भारतीय जनमानसांत विशेष प्रतिमा पहायला मिळते. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. महाराष्ट्रात पेशवे काळात लगोरी खेळ राजमान्य असल्याचे पुरावे आढळतात.लगोरी खेळ व त्याच्या लोकप्रियतेबाबत अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत.
लगोरी खेळाला सर्वजण ओलखतात व ब-याच जनांनी खेळले असेल मात्र या खेळाला आधुनिक स्वरूप देण्याचे कार्य कै. संतोष गुरव यांनी केले. सन २००९ पासून संतोष गुरव यांनी लगोरी खेळाचे नियम, मैदान, साहित्य यांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी अनेक प्रयोग करून खेळाचे आधुनिक मापदंड तयार केले.
पूर्वी हा खेळ लाकडाच्या लगो-या वापरून खेळला जात असे.परंतु आता प्लॅस्टिकच्या लगो-या वापरूनही हा खेळ खेळला जात आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये क्रीडापटूंना दुखापत होण्याची शक्यता असलेली साहित्ये वर्ज्य असतात. त्यामुळे लगोरीच्या नियमांत आणि क्रीडा साहित्यांत बदल केला आहे.
आंतरराष्ट्रीय लगोरी संघटना,आशियाई लगोरी फेडरेशन स्थापना करून तब्बल ३० देशांसह जगभरात लगोरीचा प्रचार व प्रसार सुरू झाला आहे . २५ डिसेंबर २००९ या दिवशी भारतीय हौशी लगोरी महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत २६ राज्यांमध्ये लगोरी खेळला जात असून देशभरात लगोरी खेळाला लोकप्रियता मिळू लागली आहे.
खेळाचे मैदान
लगोरी खेळाचे आधुनिक पद्धतीचे मैदान हे आयतकृत आहे, त्याची लांबी ८१ फुट असून रुंदी ४५ फुट असते. आयतकृतीच्या चारही कोप-यांवर ३X३ फुट रुंदीचे चौकोन असतात.आयताच्या मध्यभागी मध्यरेषा काढली जाते ज्याद्वारे मैदानाचे समान दोन भाग पडतात.लगोरी ठेवण्यासाठी मध्यभागी १ चौरस फूटाचा चौकोन आखला जातो.मध्य रेषेपासून मैदानाच्या दोन्ही बाजूंना निदान रेषा अखल्या जातात त्यांची मापे पुढील प्रमाणे :- ९.५ फुट मिनी व सब जूनियर गट, १०.५ जूनियर,यूथ व सीनियर गट. चेंडू पकडणा-याची स्थिति राखण्यासाठी निदान रेषेवर ३X३ फुटचा चौकोन असतो.मध्य रेषेपासून ब्रेकर रेषा ही १०.५ फुट सब जूनियर व त्या खालील गटांसाठी व जूनियर,सीनियर गटांसाठी १२ फुटांवर आखण्यात येते.
क्रीडा साहित्य : लगोऱ्या, चेंडू इत्यादि.
चेंडू : रबरपासून बनलेला असून त्याचे वजन जास्तीत जास्त ८५ ग्राम तर कमीत कमी ७५ ग्राम इतके असावे. चेंडूचा परिघ २१० मिलीमीटर ते २३० मिलीमीटर दरम्यान असतो.
लगो-या : प्लास्टिक पासून बनलेल्या ९ लगो-या वापरल्या जात असून त्यांचा क्रम ९ ते १ अशा उतरत्या स्वरूपात असतो. ज्यांचे आकार आणि रंग वेगळे असतात. प्रत्येक लगोरीच्या ठोकळ्याला क्रमांक देण्यात येतो आणि त्या क्रमानुसारच लगोरी रचली जाते.
संघाची रचना
प्रत्येक संघात १५ खेळाडू असतात त्यापैकी ६ खेळाडू प्रत्यक्ष मैदानात, ६ खेळाडू मैदानाबाहेर गेलेला बॉल पास करण्यासाठी तर ३ खेळाडू राखीव असतात.
सामन्यचे स्वरूप
सामना तीन पैकी सर्वोत्तम डाव या पद्धतीने खेळाला जातो. प्रत्येक डाव ३ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावनंतर ३० सेकंदाची विश्रांति दिली जाते. एका डावात प्रत्येक संघाला एक आक्रमण व एक संरक्षण करण्याची संधी मिलते. लगोरी फोडण्य़ासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लगोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता, लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी एक प्रमुख क्षेत्ररक्षक क्रिकेटमधील यष्टिरक्षकाप्रमाणे मागे उभा असतो.त्याचवेळी प्रतिस्पर्धी म्हणजेच संरक्षण करणा-या संघातील खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणून इतर खेळाडूंचा अंदाज घेत उभे असतात. निदान रेषे मध्ये लगोरी फोडणारे खेळाडू येऊ शकतात, पण प्रतिस्पर्धी संघ येऊ शकत नाही. लगोरी फोडणारा लगोरी फोडतानाही बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील क्षेत्ररक्षकाने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगोऱ्या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकांचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणाऱ्यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी सर्व संघ बाद होतो. लगोरी फोडल्यानंतर खेळाडूला बाद करण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूच्या हातामध्ये फक्त तीन सेकंद चेंडू ठेवता येऊ शकतो. मात्र क्षेत्ररक्षकांकडून चेंडू न लागता संघाने जर पूर्ण लगोरी लावली तर त्यांना ९ आणि एक बोनस गुणांसह एकूण दहा गुण देण्यात येतात. लगोरी फोडण्यासाठी आणि खेळाडूला बाद करण्यासाठी चेंडू ‘ओव्हर आर्म’ फेकणे अनिवार्य आहे. जर संपूर्ण लगोरी लावण्याआधी संरक्षण करणा-या संघाने आक्रामक संघातील खेळाडूला बाद केले तर जेवढ्या लगो-या लावल्या असतील तेवढे गुण संघाला मिळतात. व त्याच वेळी संरक्षक संघाला ५ गुण मिळतात म्हणजे आक्रमक संघाचे ५ गुण वज़ा होतात.सामना बरोबरीत राहिला तर मात्र गोल्डन हिट दिली जाते. यासाठी दोन्ही संघाना ५ -५ संधी लगोरी फोडण्यासाठी दिली जाते व सामन्याचा निकाल लावला जातो.
संकलन - हेमंत भाऊ पयेर, बी.एस.सी.बी.पी.एड.एम.पी.एड.(सेट)
संदर्भ,
लगोरी नियमावली- आंतरराष्ट्रीय लगोरी संघटना https://mr.wikipedia.org https://vishwakosh.marathi.gov.in
लंगडी, लगोऱ्या, विटीदांडू या खेळाचे नियम- अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ
Post a Comment