● कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
म्हसळा : प्रतिनिधी
सध्या सगळीकडे कोरोना (कोव्हीड -19) या साथ रोगाने थैमान घातले असून या रोगाचे विषाणूंची साखळी रोखण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन सुरू असल्याने उद्योग धंदे, छोट्या मोठ्या खाजगी कंपन्या बंद आहेत, कंपन्या बंद असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मागील चार पाच महिन्यांपासून नागरिक कोरोना महामारीशी लढा देऊन संसाराचा रहाट गाडा चालवीत असतानाच दि.03 जून रोजी कोकण किनारपट्टी वरील रायगड, रत्नागिरी व इतर जिल्ह्यात "निसर्ग चक्री वादळ" रुपी अस्मानी नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट येऊन धडकले आणि या वादळात अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. नागरिकांचे राहते घर पडले, काही घरांचे छप्पर तुटले, फळबागा उध्वस्त झाल्या, शेतजमीन, पशुपालन अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याचबरोबर घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू पावसाने भिजून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यात लोकांचे संसार उपयोगी वस्तू नष्ट होऊन गोर गरिबांचे संसार उघड्यावर पडले आणि आधीच कोरोना महामारीशी लढा देऊन हैराण झालेल्या लोकांवर चक्री वादळामुळे पुन्हा उपासमारीची वेळ आली. या उपासमारीतून सुटका होण्यासाठी आणि नागरिकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी एक हात मदतीचा या सेवाभावी उद्देशाने म्हसळा तालुक्यातील घुमेश्वर गावातील तरुण कार्यकर्ते श्रीकांत बिरवाडकर यांच्या प्रयत्नाने आणि तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक अलिशेठ कौचाली यांच्या सहकार्याने दि.13 जुलै रोजी बशीरभाई मेहमूद हजवानी फाउंडेशन मदतीसाठी धावून आले आणि या फाउंडेशन मार्फत जवळपास 120 कुटूंबाना प्रत्येकी पाच किलो तांदूळ, दोन किलो कांदे, दोन किलो बटाटे, लसूण, एक किलो गोडातेल, चहापावडर, मसाले, साबण अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत स्वरूपात वाटप करण्यात आले.
जेष्ठ समाजसेवक अलिशेठ कौचाली यांनी सांगितले की रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना साथ रोगामुळे हवालदिल झालेल्या आणि 03 तारखेला झालेल्या निसर्ग चक्री वादळामुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त झाले असल्याने खेडोपाड्यातील लोकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. अशावेळी थोडासा आधार म्हणून बशीरभाई मेहमूद हजवानी फाउंडेशन कडून एक मदतीचा हात देऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. या फाउंडेशन मार्फत काही गावातील नागरिकांना पत्रे वाटप केले तर काही ठिकाणी एकदम गरीब गरजूंना रोख रक्कम मदत स्वरूपात देण्यात आले आहेत. गावातील सर्वच कुटूंबाना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केल्याबद्दल बशीरभाई मेहमूद हजवानी फाउंडेशनचे पत्रकार श्रीकांत बिरवाडकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले व फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. गावातील सर्व ग्रामस्थांनी बशीरभाई मेहमूद फाउंडेशनला मनोमन धन्यवाद दिले.
वस्तूंचे वाटप करताना तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक अलिशेठ कौचाली, आदमभाई हजवानी, इसाक कौचाली, वशीम धनसे, इरफान पोरे, मुफ्ती खोपटकर व फाउंडेशनचे पदाधिकारी यांसह गाव अध्यक्ष केशव महागावकर, माजी पोलीस पाटील धोंडू घोले, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, मंगेश दिवेकर, सुरेश गायकर, अनंत रिकामे, कृष्णा खेडेकर, प्रवीण घोले, संदेश घोले, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment