म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीत पोल्ट्री फार्मवरील पत्रे, पोल्ट्रीच्या जाळ्या, खाद्याची भांडी, पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याची मरतूक इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी यांचे निसर्ग वादळामुळे झालेले नुकसान व त्यांना द्यावयाची नुकसान भरपाई या विषयाबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज मंगळवारी मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
त्याअनुषंगाने या बैठकीत पोल्ट्री फार्मच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून हा प्रस्ताव राज्याचे अर्थमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांच्याकडे पाठवून निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पोल्ट्रीधारकांना योग्य ती भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोल्ट्रीधारकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याआधारे संबंधित नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
Post a Comment