बोर्लीपंचतन येथील हरहुन्नरी कलाकार बाळा वर्तक यांचे दुःखद निधन ; सप्तरंगी कलाविष्कार अबोल झाला


 मकरंद  जाधव-बोर्लीपंचतन 
   श्रीवर्धन तालुक्यामधील बोर्ली पंचतन गावचे रायगड भुषण सन्मानीत सुपुत्र प्रसीध्द चित्रकार पुरषोत्तम भास्कर वर्तक उर्फ सर्वांचा लाडका बाळा यांचे आज गुरुवार दि.२५ जुन रोजी पहाटे त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ६१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला बाळा लहानपणापासूनच कलेची आवड जोपासणारा चित्रकला व हस्तकला यामध्ये असणाऱ्या रुचीमूळे व शाळेपासूनच कलेशी जोडलेली नाळ त्याला बोर्ली पंचक्रोशीत प्रसिद्ध करून गेलीं.मनस्वी व स्वविचारी असणाराऱ्या बाळाचे विचार त्याच्या कलाविष्कारातून प्रकट होत असत. त्याची चित्रशैली अगदी सोपी होती.त्यात जास्त तंत्र वगैरे काही नाही.पूरक रंगसंगती,भडकपणा चित्रात कधीही जाणवला नाही. मितभाषी शांत,संयमी आणि अविवाहीत असल्याने संन्याशासारखे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व पण त्याची पेंटीग मात्र भरभरून बोलणारी, बघणार्‍याला विचार करायला लावणारी बाळाने अनेक कला जोपासल्या होत्या त्यामध्ये त्याचे आवडीचे विषय म्हणजे चित्रकला एखाद्या परिपक्व चित्रकाराला लाजवेल असे हुबेहूब चित्र काढण्याची कला,त्यासोबतच रांगोळी,हस्तकला,पाककला अशा अनेक कलेत पारंगत असलेला बाळा परमेश्वरावर असणाऱ्या अपार श्रध्देने आपल्या उत्तम कलेचे दर्शन घडवत आयुष्यातील एक एक पायरी चढत होता पण नुसत्या कलेने पोट कसं भरणार ? असा प्रश्न देखील उभा होताच.मग त्याच कलेचा उपयोग करुन बाळाने कापडावर रंगरोटीचे काम सुरू केले राजकीय व इतर शुभेच्छांचे बॅनर,थर्माकोलवरील पेंटीग,गणपती सजावट,चलचित्र रेखाटन अशी अनेक कामं सुरु करुन उदनिर्रवाहचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना बाळाला आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याची जाणीव होतीच त्यामुळे सामाजिक कार्यात बाळाने सहभागी होत गरजवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेणे सार्वजनिक गणेशोत्सव व धार्मिक कार्यक्रमात आपल्या कलेचे योगदान अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत आपले कार्य अविरत सुरु ठेवले.त्याने केलेल्या या कार्याची दखल रायगड जिल्हा परीषदेने घेऊन सन २०१५ साली मानाच्या अशा रायगड भुषण पुरस्काराने बाळाला सन्मानित केले.अशा या सर्वांच्या लाडक्या चित्रकाराच्या आयुष्याचे शेवटचे जीवन कारुण्याने डबडबले. त्याची ओळख माहीत असलेला प्रत्येकजण त्याच्या जीवनाकडे पाहून हळहळायचा अखेरच्या क्षणी अशा  कारुण्याने जीवन जगलेल्या एका हसतमुख कलाकाराचा अंत एकाकी झाला.परंतु त्याच्या कलेच्या स्मृती लोकांच्या मनात दिर्घकाळ कायम राहतील हिच त्याला वाहीलेली भावपुर्ण श्रध्दांजली असेल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा