खा. शरद पवार यांच्याकडून चक्रीवादळातील नुकसानग्रस्त म्हसळा तालुक्याची पाहणी सुरु


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांच्या कोकण दौर्‍याला रायगडातून आज (9 जून) सुरुवात झाली. जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करत आहेत.
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. आज (9 जून) रायगड आणि उद्या (10 जूनला) रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
आज सकाळी ते रायगडात दाखल झाले. त्यानंतर खा. शरद पवार यांनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या म्हसळा येथील एका मदरशाला भेट दिली. म्हसळा ग्रामीण रुग्णालयालाही भेट देऊन तेथील आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे आदींची उपस्थिती आहे.
जिल्ह्यातील माणगाव तसेच श्रीवर्धन तालुक्यातील चक्रीवादळग्रस्त भागालाही ते भेट देऊन तेथील नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा