मुंबई प्रतिनिधी
ज्ञानदीप मंडळ संचालित, संत जोसेफ महाविद्यालय मराठी आणि एन. एस. एस. विभाग तसेच विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ५ जून २०२० रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात होते. कोरोनाच्या संसर्गामुळे सारं जग लॉकडाऊन असताना, सदर स्पर्धा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भरवण्यात आली होती. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील ५६ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
पर्यावरणाचा होणारा र्हास हा मानवी जीवनाशी जोडला गेला आहे. त्यासाठी मानवच जबाबदार आहे. हीच ती वेळ आहे, समाजाला जागृत करण्याची. पर्यावरणाशी आपली नाळ घट्ट जोडण्याची. आज आपण पर्यावरण सांभाळलं तर आपल्या उद्याच्या पिढ्या आणि अखिल मानवजातीसाठी ही सर्वोत्कृष्ट भेट ठरेल. हाच संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी विद्यार्थी दशेतल्या साहित्यिकांचा सहभाग महत्वाचा. एखादी गोष्ट जितक्या सहजतेने कवितेतून पोहचवता येते, तितक्या सहजतेने अजून कोणत्याच प्रकारे पोहचवता येत नाही आणि विद्यार्थी मित्रांकडून जाणारा संदेश उद्याच्या भारतासाठी आधुनिक विचारांची नांदी ठरेल, असे मत स्पर्धेचे परीक्षक गुरुदत्त वाकदेकर यांनी मांडले.
सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विन्सेट डिमेलो यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. कोरोना संक्रमण काळात विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पर्यावरणा विषयी जागृत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
जेष्ठ कवी गुरुदत्त वाकदेकर, कवयित्री अॅड. नेहा धारूळकर आणि एम. एम. पी. शाह महाविद्यालयात मराठी विषय शिकविणा-या प्राध्यापिका रश्मी शेट्ये- तुपे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विश्वभान प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश संसारे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला.
(प्रथम क्रमांक) प्रतीक पवार, रुईया महाविद्यालय, मुंबई, (द्वितीय) सुप्रिया गांधी, कनिष्ठ महाविद्यालय, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी, मुंबई, (तृतीय) स्नेहा सुर्यराव, लक्ष्मण देवराव सोनावणे महाविद्यालय, कल्याण, (चतुर्थ) प्रणय कांबळे, साठ्ये महाविद्यालय, मुंबई, (पंचम) कोमल दुर्गे, आर्दश महाविद्यालय, बदलापूर, (उत्तेजनार्थ) सौ. विशाखा भगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे, श्रावणी सुर्वे, पी. इ. एस. नाईक महाविद्यालय, फोंडा, गोवा, श्रद्धा ठाकूर, विवा महाविद्यालय, विरार, दिप्ती भवारी, ओंदे महाविद्यालय, विक्रमगड, स्वराली पाटील, कै. केदारी रेडकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज तसेच गोवा विद्यापीठातील षशांक नायक आणि ऋषिकेश तोटेकार यांना कोकणी भाषेतील काव्य रचनेसाठी 'उल्लेखनीय काव्य' पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सर्व विजेत्यांचे विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि प्राध्यापकांनी विशेष कौतुक केले आहे.
Post a Comment