प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या तुकडीने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने लगेच ४-५ दिवसांत शासनाकडून नुकसानभरपाईसाठी पंचनामे पूर्ण होणे अवघड आहे. पावसाचे दिवस असल्याने घरांची डागडुजी केली नाही तर लोकांना त्रास सहन करावा लागेल. म्हणूनच प्रत्येकाने आपले घर, दुकाने किंवा शेती, फळबागा यांच्या झालेल्या नुकसानीचे फोटो व व्हीडियो काढून ठेवावे. त्यानंतरच डागडुजीची कामे सुरूकरावीत. हे फोटो व व्हीडियो पंचनाम्यासाठी ग्राह्य धरावे, अशी विनंती मी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांना केली आहे. प्रशासकीय पातळीवर डागडुजी तसेच नुकसानभरपाईच्या कामात लोकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच वीजेचे खांब काही ठिकाणी कोसळले आहेत, विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. दुरूस्तीसाठी आपल्या जिल्ह्यातील तुकडी काम करत आहे. परंतु, हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील तुकडी उपलब्ध करून देण्याची विनंती माननीय ऊर्जामंत्र्यांना केली आहे. त्यावर काम सुरू झाले आहे.
चक्रीवादळ गेले असले तरी करोनाचा धोका कायम आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येकाने डागडुजीची कामे करायची आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नये. आधीसारखीच स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे.
असे आवाहन अनिकेत तटकरे यांनी केले
Post a Comment