प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यालाही ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला असून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. घरे, इमारतींवरील छप्पर उडाले, घरांवर झाडे कोसळली, रस्ते बंद झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोरोनाच्या संकटातून सुटका झालेली नसताना, नैसर्गिक संकटाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून टाकले आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा सुमारे तीन तास सुरु होता. या वादळाने क्षणात होत्याचे नव्हते करुन टाकते. अपेक्षेप्रमाणे जास्त थैमान घालून, या चक्रीवादळाने म्हसळा तालुक्यात मोठे नुकसान केले.
या वादळात प्रस्तावित कोव्हीड सेंटर म्हणजेच आय.टी.आय.च्या वरवठणे येथील इमारतीवरील पत्र्याचे छप्पर उद्ध्वस्त झाले आहे, तालुक्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. कोळे येथील रहिवासी विलास चाळके यांच्या घरावरील संपूर्ण छप्पर उडून गेले आहेत. शहरातील घनसार लॉजवरील व प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. सुधीर चोचे यांच्यादेखील इमारतीवरील पत्र्याची शेड कोलमडून पडली आहे.शहराबाहेर कादरी पेट्रोल पंपाशेेेजारी स्टार भारतासमोर झाडाची मोठी फांदी कोसळली आहे.
सुमारे 100 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सुरेश बोरकर आणि नरेश बोरकर यांच्या घरावर कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कुंभार वाडा येथील रहिवासी सुशील म्हशिलकर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून त्यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. घरांची पडझड, झाडे उन्मळून पडल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले असून, या चक्रीवादळात नेमके किती नुकसान झाले, हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
मोबाईल सेवा केव्हा चालू होतील
ReplyDeletePost a Comment