चक्रीवादळात उडाल्यानंतर बाजारपेठेत लोंबकळणारी पत्र्याची शेड धोकादायक



गणेश प्रभाळे : दिघी 
 रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला ‘निसर्ग’ चक्रीवादळाने दिलेल्या जखमा अद्याप ओल्याच आहेत. कारण अनेकांचे छप्पर कुठल्या कुठे उडून गेल्याने कित्येक कुटुंब स्थिरावले नाहीत. याच पार्श्वभूमीवर वादळातील अशीच एक उडालेली पत्र्याची शेड बोर्लीपंचतन बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर लोंबकळत असल्याने बाजारहाट करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक बनली आहे.

चक्रीवादळ 3 जून रोजी कोकण किनार्‍यावर दाखल झाले. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेला आज आठ दिवस होत असताना बोर्लीकरांच्या डोक्यावर आणखी एक टांगती पत्र्याची शेड धोक्याची घंटा देत आहे. परिणामी अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शेड हटवण्याची मागणी येथील नागरिक सातत्याने करत आहेत. मात्र, याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

या वादळामध्ये तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसानीबाबत अघटित घटना ग्रामस्थांना संतापजनक ठरल्या आहेत. उलटसुलट वादळामुळे कोणती वस्तू कोणावर पडून मोठया प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या पत्र्याच्या शेडमुळे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना घडू नये.

यावेळी आपत्तीजनक परिस्थितीत इतर प्रशासनाची जबाबदारी देखील अनेक विभाग स्वतःहून घेत आहेत. मात्र, या घटनेत पुढाकार घेऊन संबंधित प्रशासन आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. त्यामुळे या लोंबकळणाऱ्या धोकादायक पत्रा  शेडला कोण हटवणार व येथील जनजीवन सुरळीत करण्यासाठी कोण पुढाकार घेणार? असा सवाल येथील ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा