फोटो - म्हसळा तहसील कार्यालयात आढावा बैठक घेताना खासदार सुनिल तटकरे व अन्य अधिकारी
● बागायतदारांना एकरी भरपाई न देता प्रत्येकी झाडामागे नुकसान भरपाई देण्याची केली मागणी
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
कोकण किनारपट्टीसह रायगड जिल्ह्यात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी व संबंधित विभागाकडून पंचनामे करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी शनिवारी म्हसळा येथे खासदार सुनिल तटकरे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान तालुक्यात निसर्ग चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन बागायतदारांना एकरी भरपाई न देता प्रत्येकी झाडामागे नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार तटकरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे यावेळी केली आहे.
महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्री वादळाने नागरिकांचे जीवन उध्वस्त करून टाकले आहे या चक्री वादळाची नुकसान आजच्या घडीला किंमती मधे मोजू शकलो नसलो तरी शासन स्तरावर लोकांच्या खाजगी मालमत्ता, बागायतदार, शासकीय इमारती व इतर मालमत्ता यांचे झालेल्या वित्तहाणीचे तातडीने पंचनामे करून या नुकसानीत बागायत दारांच्या झालेल्या नुकसानीचे एकरी भरपाई न देता प्रत्येकी झाडामागे पुढील पाच ते सहा वर्षांपर्यत झालेली नुकसान भरपाई केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकाने द्यावी अशी मागणी खासदार सुनिल तटकरे यांनी वार्तालाप करताना केली आहे.
म्हसळा तहसील कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्ते साफसफाई, वीजपुरवठा सुरळीत करणे, पाणी पुरवठा करणे, आरोग्य सुविधा आदी सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांचे समावेत जिल्हा परिषद सभापती बबन मनवे, उपसभापती मधुकर गायकर, नगराध्यक्ष जयश्री कापरे, तालुका अध्यक्ष समिर बनकर, माजी सभापती नाझिम हसवारे, तहसीलदार शरद गोसावी, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पाणीपुरवठा अधिकारी युवराज गांगुर्डे, नायब तहसिलदार के.टी.भिंगारे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, यांसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी निसर्ग चक्री वादळाचा आढावा घेताना म्हसळा तालुक्यातील अधिक माहिती घेतली असता एनडीआरएफ ची टीम आधिच दाखल केली असल्यामुळे तालुक्यातील मुख्य रस्ते लवकरात लवकर सुरू करण्यास मदत झाली असून उर्वरित ग्रामीण भागातील रस्ते देखील दोन तीन दिवसांत पूर्ववत सुरू होतील. त्याचबरोबर तालुका ठिकाणी वीज पुरवठा अभावी ज्या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत. अशा मोठ्या लोकवस्तीच्या चार ठिकाणी जनरेटर उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर अधिक च्या ठिकाणी जनरेटरची मागणी असल्यास तहसीलदारां मार्फत उपलब्ध करून दिले जातील. खासदार या नात्याने केंद्र सरकारकडे झालेल्या नुकसान भरपाईचे पाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या पाच हजार कोटी रुपयांमधे शासकीय इमारती, नागरिकांची झालेली वित्तहानी, बागायतदार, मत्स्यव्यवसाय, कृषी, वीजपुरवठा या सर्वच बाबी समाविष्ट असल्याने जास्तीत जास्त व तातडीची मदत केंद्र सरकारने करावी त्यासाठी पक्षाचे नेते खासदार शरद पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.
खासदार तटकरे यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर नागरिकांना आव्हाहन करताना सांगितले की प्रत्येकाने आता प्रत्येकाची काळजी घ्यावी. जिल्ह्यात निसर्ग चक्री वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामात शासकीय यंत्रणा गुंतलेली असून कोरोनाचे विषाणू अधिकाधिक फैलावणार नाहीत याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर घरे व इमारती यांची झालेली नुकसान यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पत्रे व इतर साहित्य खरेदी करीत आहेत त्यामुळे स्थानिक व्यापारी, डीलर यांनी वस्तूंचे दर न वाढवता पूर्वीच्याच दरात नागरिकांना वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. जर कोणत्याही व्यापारी, दुकानदाराने वस्तू अधिक च्या किमतीने विकल्या तर त्यांच्यावर फोउजदारी गुन्हे दाखल करण्याचा सूचना खासदार तटकरे यांनी पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांना दिल्या. तसेच जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, महाड, रोहा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यात भेटी दिल्या असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.
Post a Comment