येत्या तीन दिवसात पंचनामे पूर्ण करू -आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असून झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार आहेत. वादळाच्या नुकसानीचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून नुकसानीची माहिती घेतली. रायगड जिल्ह्यात वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.
वादळामुळे दोन नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर वादळाचा रायगड जिल्ह्यातील १३ ते १४ तालुक्यात फटका बसला आहे. त्यामुळे रायगडसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं. रायगडमध्ये सध्या नुकसानीचा आकडा सांगता येणार नाही. येत्या तीन दिवसात पंचनामे पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हसळा श्रीवर्धन ची रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिथं पर्यन्त पोहोचण्यात अडथळा येत असल्याचे ही त्या म्हणाल्या.
रायगडमधील १८ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याने जिवीतहानी टळल्याचं सांगितलं. सर्व रस्ते आणि वीजपुरवठा प्राधान्यानं पूर्ववत करण्याचा प्रयत्न असल्याचेही अदिती तटकरे स्पष्ट केलं. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा