प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
जोरदार वादळी वार्यासह आलेल्या निसर्ग चक्रवादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्र रुपामुळे रायगडात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने बर्याच ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उरण जीटीपीएस-220 किव्हो. या उपकेंद्रासह कांदळगाव, पाभरा व थळ या प्रत्येकी 100 कि.व्हो. उपकेंद्रांतर्गत येणार्या उरण, अलिबाग, मुरुड, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन व गोरेगांव या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या 22 कि.व्हो. उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळे आठ तालुक्यांतील सुमारे 2 लाख 68 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.
6 बाय 6 उंचीचे 3 खांब गोंडघर इनकमर वीजवाहिन्या तुटून खाडीत कोसळल्या. गोरेगाव उपविभागांतर्गत येणार्या कांदळगाव उपकेंद्राच्या उच्चदाब वाहिन्या जोरदार वार्यामुळे बंद करण्यात आल्या होत्या. चक्रीवादळामुळे अंबर्ले येथील एक रोहीत्र आणि 3 उच्चदाब खांब कोसळून पडले. वडाचा कोंड येथे एका रोहित्राचा खांब वाकला. लोणेरे येथील एक लघुदाब खांब कोसळून पडला. वाशी येथील 22 के.व्ही. फीडर ट्रिप झाला होता. वाशी येथील सेक्टर 17 मध्ये लोंढे मामा खानावळजवळील लघुदाब वाहिनीवर झाड पडले होते. नावाडा येथेही एक उच्चदाब खांब कोसळून पडला. करंजाडे, बौध्दवाडा रस्त्यालगतचे तसेच घोटगाव येथील खांबावर झाड पडल्याने खांब कोसळून पडलेत. तुर्भे एम.आय.डी. सी. येथील 22-22 के.व्ही. सबस्टेशनच्या कंपाउंड भिंतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे चक्रीवादळ राज्यात दोन दिवस घोंघावत असून या वादळाचा सामना करण्यास वीज कंपन्या सज्ज असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले. या वादळाच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संचालक दर्जाचा अधिकारी नोडल अधिकारी या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, घाबरू नये व प्रशासन आणि वीज कंपन्या आपल्या सेवेसाठी तत्पर असल्याचेही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.
Post a Comment