कोकणाची भौगोलिक रचना इतर प्रांतांच्या तुलनेत भिन्न
शिक्षण, रोजगार , व उदरनिर्वाह याचा यक्षप्रश्न सर्वांसमोर उभा.
श्रीवर्धन ( संतोष सापते )
महाराष्ट्राच्या इतर प्रांतांच्या तुलनेत कोकणाची भौगोलिक परिस्थिती भिन्न स्वरूपाची आहे. ०३ जून २०२० पूर्वीचा रायगड जिल्हा व सद्य स्थितीतील रायगड जिल्हा प्रचंड तफावत निदर्शनांस येते. बुधवार च्या एका निसर्ग चक्रीवादळाने अवघ्या पाच तासात सर्वसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न आणि भविष्य यांचा अक्षरशः चुराडा केला. ताशी १२० चा वारा व जोरदार पाऊस यामुळे नारळ, सुपारी,केळी व आंबा या मुख्य पिकांना अक्षरशः जमीनदोस्त केले. कोकणच सौंदर्य असलेल्या विविध जातीच्या वृक्षांना, वेलींना उन्मळून टाकले. मानवी दोन दोन पिढीची साक्ष देणाऱ्या वटवृक्ष, पिंपळ, फणस पर्णहीन बनले. डोंगरमाथ्यावर स्थित असलेल्या अनेक वृक्षांचा जीवनप्रवास अवघ्या पाच तासात समाप्त झाला. कोकणची खरी संपत्ती काही काळासाठीतरी नष्ट झाली. शेतीप्रधान कोकणामध्ये नारळ व सुपारी या पिकांच्या उभारणीसंधार्भात धोरणात्मक भूमिका बजावणे अगत्याचे आहे. कारण नारळाचे गावठी रोपटे लावून झाल्यानंतर त्याला फळप्राप्तीसाठी साधारणतः अकरा वर्ष लागतात. व जो संकरित आहे त्याला जवळपास सहा वर्ष लागतात. आणि सुपारी ला फळ येण्यासाठी किमान पाच ते सहा वर्षे आवश्यक आहे. श्रीवर्धन तालुक्याचा एकंदरीत विचार करता या ठिकाणच्या लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटन यावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूमुळे पर्यटन मृत्यूशयेवर पोहोचले आहे. व निसर्ग चक्रीवादळाने शेतीची अगणित व कधीही भरून न येणारी हानी केली आहे. आज सर्वसामान्य माणसाच्या समोर जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनवृद्धीसाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने शेती करत असलेल्या व्यक्तीला प्रतिवर्षं नारळ सुपारी केळी व फणस याद्वारे साधारणतः साठ हजार च्या आसपास उत्पन्न प्राप्त होत होते मात्र आगामी साधारणतः आठ वर्षांसाठी या उत्पन्नास संबंधित शेतकरी मुकणार आहे असे म्हटले तरी चालेल.आंब्यासारखे डेरेदार अनेक पिढीचे साक्ष देणारे वृक्ष अस्तित्वासाठी चक्रीवादळात झुंजताना दिसले. कोकणातील आंबा शेतकऱ्यांना माफक उत्पन्न देण्याचा स्त्रोत आहे. प्रत्येकाच्या वाडीत आणि घराभोवती आंब्याची झाडे सर्वत्र निदर्शनास येत होते. मात्र आता आंबा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. अश्या वेळी त्यास सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्यसरकारने दिलेलं शंभर कोटीच आर्थिक पॅकेज चक्रीवादळग्रस्थ लोंकांच्या दुःखावर फुंकर घालण्यापर्यंत ठीक आहे मात्र त्या मदतीतून वादळग्रस्थ लोकांच्या जीवनाला नवीन दिशा नवीन आशा व स्फुर्ती देणं प्रथमदर्शनी तरी अशक्य वाटत आहे.रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, मुरुड, अलिबाग या तालुक्यातील जनतेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. रायगड प्रशासनाने केलेल्या योग्य आपत्ती पुर्व नियोजनामुळे सुदैवाने मोठ्या स्वरूपातील जीवितहानी टळली. त्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करणे योग्य ठरेल. कारण कोरोनामुळे प्रशासकीय यंत्रणेत काम करणारा प्रत्येक घटक पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असलेला दिसत आहे. जिल्हाधिकारी , तहसीलदार ते तलाठी सर्व प्रशासकीय कर्मचारी राबताना दिसत आहेत. अनेक डॉक्टर, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाचा बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र देशासमोर आलेल्या प्रत्येक संकटास निधड्या छातीनं सामना करण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेने केले आहे. आपत्तीचे आपत्ती पुर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पाश्चात्य असे तीन गटात वर्गीकरण केले जाते. निसर्ग चक्रीवादळ येणार असल्याची सूचना श्रीवर्धन तालुका प्रशासनानं दोन दिवस अगोदर देण्यात आली होती. त्यानंतर प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी मुख्याधिकारी किरणकुमार मोरे वनाधिकारी कुलदीप पाटकर यांनी योग्य नियोजन केले आहे . आपत्ती पूर्व श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, भरडखोल, दिघी व श्रीवर्धन शहरातील जीवना कोळीवाडा या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश मिळवले. तालुक्यातील सर्व सरपंचांना वादळाच्या सूचना देऊन योग्य आपत्ती पुर्व नियोजन केले. मात्र मोबाइल सेवा, इंटरनेट यास पर्याय शोधण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली. दळण वळण व संपर्क वादळादरम्यान पूर्णतः खंडित झाले. महावितरनाच्या सर्व पोलची ( खांबांची) वाताहत झाली. त्यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युत पुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला आहे. श्रीवर्धनमध्ये वादळ जवळपास पाच तासाच्या आसपास थैमान घालत होते. सुरवातीच्या एक तासानंतर मध्ये साधारणपणे ४५ मिनिटे शांत झाल्याचे जाणवले. त्या कालावधी दरम्यान तालुका प्रशासनाने मोठ्या हिंमतीने श्रीवर्धन शहर परिसरात घराच्या बाहेर पडलेल्या नागरिकांना पूर्ववत घरात जाण्याच्या सूचना दिल्या. ४५ मिनिटानंतराचे वादळ मात्र विध्वंसकारी असल्याचे दिसून आले. पाऊस आणि वारा याने श्रीवर्धनमधील जनतेच्या मनात धडकी भरवली. घरावरची कौल , पत्रे, घराच्या भिंती आणि असंख्य वृक्ष लोकांच्या डोळ्यासमोर उध्वस्त झाले. वादळानंतर भयभीत झालेल्या अनेक लोकांनी नगरपरिषदेच्या शाळा, खाजगी हॉटेल्स , आणि एस टी स्थानकात आश्रय घेतला. या स्थलांतरित व निर्वासित लोकांना शासन नियमित अन्नपुरवठा करत आहे. वादळात घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी बाहेरील अनेक महसूल कर्मचारी श्रीवर्धन मध्ये दाखल झाले आहेत. रायगड प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुक्यातील जवळपास सत्तर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खाते नोंद पंचनामा करत असताना करून घेण्यात आली आहे .सर्वसामान्य लोकांनी शासनाची मदत येण्या पूर्वीच आपल्या घराच्या डागडुजी ला सुरुवात केली आहे .कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला वादळाने पूर्णतः जेरीस आणले आहे .त्यात अनेक दुकानदारांनी वाजवी किंमती पेक्षा जास्त दराने मालाची विक्री केली आहे .मात्र पावसाळा डोक्यावर आला असताना सर्वसामान्य जनतेने मिळेल त्या किंमतीत घर बांधणी साठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आहे .ग्रामीण भागातील लोकांची परिस्थिती भयावह आहे .आंब्याचे हातातोंडाशी आलेले पीक उत्पन्न कोरोनाच्या संकटा मुळे वाया गेले आहे .जिल्ह्याच्या बाहेर वाहतुक करणे शक्य न झाल्याने आंब्याच्या विक्रीवर मर्यादा आल्या होत्या .पर्यायाने आंबा बागायतदार हवादील झाले आहेत .वादळाच्या पश्चात युद्धपातळीवर सर्व यंत्रणा कार्यरत असताना दिसत आहे .रायगडचे खासदार सुनील तटकरे ,पालकमंत्री अदिती तटकरे यांनी वेळोवेळी विविध बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळ ग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला आहे .तहसील सचिन गोसावी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उच्चारलेले मला माझा तालुका पुन्हा उभा करायचा आहे त्या साठी मी जीवतोड मेहनत करणारच दोन वाक्य फारच मनाला उभारी देणारे वाटले .
शेतीच्या उभारणीसाठी सुधारित बियाणे व सवलतीची गरज ...कोकणचे भौगोलिक स्थान व परिस्थिती लक्षात घेऊन शेती पुरक बाबींचा पुरवठा होणे आवश्यक आहे .श्रीवर्धन शहरात जवळपास २१० सुपारी व नारळाच्या वाड्या होत्या .तालुक्यातील हरिहरेश्वर , दिवेआगार ,मारळ ,बागमांडला, नागलोली अशा अनेक गावांत नारळ सुपारीचे पीक घेतले जात होते .आजमितीस सदरचे पीक जमीनदोस्त झाले आहे .महाराष्ट्राच्या इतर प्रांतात नैसर्गिक आपत्ती आल्यास एक ते दोन वर्षात परिस्थिती पूर्ववत होते .मात्र कोकणात घेतली जाणारी सर्व पिके ही भिन्न स्वरूपाची आहेत .महाराष्ट्रात कोकणात तांदळाचे पीक घेतले जाते इतर प्रांताना ते भौगोलिक परिस्थिती मुळे शक्य होत नाहीत .जवळपास जून ते सप्टेंबर पर्यंत निरंतर पाऊस कोकणात पडतो .या कालावधीत इतर कोणतेही पीक घेणे शक्य नाही पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य भाव व सवलतीत बियाणे व साहित्य आगामी कालावधीत साठी देणे गरजेचे आहे .कोकणातील शेती ही हेक्टरात नसून गुंठ्यांत आहे .एका सातबाऱ्यावर चार चार व्यक्तींचे नावे आहेत .सरकारने मदत करतांना किंवा सवलत देताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे .
कोकणातील पर्यटन स्थळे विकास गरजेचा ... पुराण व उपनिषदे या नुसार कोकणाला देवभूमी म्हटले आहे .अथांग सागर व ऐतिहासिक पार्श्वभूमी या मुळे देशातील विविध राज्यातून पर्यटक कोकणात येतो .हरिहरेश्वर , पेशवे मंदिर , सुवर्ण गणेश मंदिर ,ऐतिहासिक साक्ष देणारे किल्ले सदैव पर्यटकांचे आकर्षण बिंदू राहिले आहेत .मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि पर्यटन विकास गतप्राण झाले आहे .त्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या रोजगारा पासून स्थानिक तरुण वंचित राहत आहे .चक्रीवादळ ग्रस्तांच्या नवनिर्मिती साठी पर्यटन विकास हा महत्वाचा निर्णायक मुद्दा ठरणार आहे .
शालेय शिक्षण , शाळांची भौतिक स्थिती व सरकारी धोरण ...कोरोना मुळे राज्यातील सर्व शिक्षण संस्था बंद आहेत .०३ जून ला वादळाने रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे .शाळांच्या भिंती , छत अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत .सर्वसामान्य माणसांची घरे पुर्ववत करण्यासाठी पर्याप्त निधी सरकार कडून मिळणे अशक्य वाटत असताना शाळा व महाविद्यालय यांना सुस्थितीत आणण्यासाठी किती काळ लागणार हे आजमितीस छातीठोक पणे सांगणे अवघड आहे .या परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन ज्ञानार्जन करणे कठीण असल्याचे प्रथमदर्शनी वाटते .त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शाळांच्या भौतिक सुविधा पुरवत कशा पद्धतीने होतील या कडे लक्ष वेधने अगत्याचे आहे .दुपारी बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्याला चक्रीवादळाच्या आर्थिक व मानसिक धक्कयातून बाहेर पडण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे .त्यामुळे संबधित चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या सर्व घटकांच्या मुलांना शालेय शुल्क माफ करणे गरजेचे आहे .महाराष्ट्रातील इतर भागात नैसर्गिक आपत्ती ने बाधित झालेल्या लोकांना शालेय शुल्कात सवलत व नोकरभरतीत काही अंशी जागा आरक्षित ठेवल्या जातात त्या स्वरुपाचे निर्णायक धोरण सरकारने घेतल्यास रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाला जगण्याची उमेद निर्माण होईल .
रायगड जिल्ह्यातील कोळी बांधव यांच्या समस्या .....समुद्र हेच विश्व मानून आजीवन दर्यावर हुकूमत गाजवत मनसोक्त आनंद घेत जीवन जगणाऱ्या कोळी बांधवावर गेल्या दोन वर्षात अनेक नैसर्गिक संकटे आली त्यामुळे कोळी समाज निराशेच्या गर्तेत लोटला गेला आहे .चक्रीवादळाने कोळी समाज गलितगात्र झाला आहे .रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास कोळी समाज मोठ्या संख्येने आहे .वादळात अनेकांच्या बोटी फुटल्या , नष्ट झाल्या आहेत . सरकारने कोळी समाजच्या बिघलेल्या आर्थिक स्थिती साठी अभ्यासपूर्ण व निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे .
वादळे येतील व जातील पण मानवी मन सदैव नाविन्याचा शोध घेत आयुष्य ध्येयासाठी समर्पित करून वाटचाल करत राहणार आहे .
Post a Comment