अभय पाटील : बोर्लीपंचतन
निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन तालुक्यामध्ये घरे, शेती, फळझाडे इत्यादींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वर्गाने या नैसर्गिक आपत्तीत मोलाची मदत करीत महत्वाचे रस्ते मोकळे केले.
श्रीवर्धनमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अखेर दिघी सागरी पोलीस प्रशासनानेच मदतीसाठी अहोरात्र मेहनत करत इतर प्रशासनांची जबाबदारीदेखील स्वतःच्या खांद्यावर घेतली. आपत्तीजनक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता स्वतः जातीने दिवसरात्र रस्त्यावर उतरून रस्त्यावर कोलमडून पडलेली झाडे, लोकांच्या घरांवरील, मंदिरांवरील झाडे तोडून बाजूला करणाऱ्या दिघी सागरी पोलिसांच्या कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाने थैमान घातलेले असताना पोलीस प्रशासन योद्धा बनून आपले चोख कर्तव्य बजावत आहेत तर दुसरीकडे रायगडमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटानेदेखील जनजीवन विस्कळीत केले आहे. वाऱ्याच्या अतितीव्र तडाख्याने लोकांच्या घरांवर, ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासन जनजीवन सुरळीत करण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसले.
श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे इतर तालुका प्रशासन वेळेवर सर्वच ठिकाणी पोहोचू शकले नाही. यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने रस्त्यांवर उतरून झाडे तोडुन बाजूला करत आहेत; एवढेच नाही तर लोकांच्या घरांवर, गावांतील मंदिरांवर पडलेली झाडेसुद्धा बाजूला करण्याचे काम पोलीस प्रशासनाने केेल्याने सर्वत्र पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
झालेल्या चक्रीवादळामुळे श्रीवर्धन तालुक्याचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे, छप्पर उडाले असून विजेचे खांबदेखील जमीनीवर कोलमडले आहेत. परिणामी विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. जिल्ह्यात 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे इत्यादींचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु आपत्तीजनक परिस्थितीत प्रशासन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने दिघी सागरी पोलीस प्रशासनाकडून गावांमध्ये तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले होते.
यामध्ये दांडगूरी- श्रीवर्धन मार्ग, धनगरमलई मार्ग असा सुमारे 25 किमी चा मार्गामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ मोठी झाड रस्त्यावर पडली होती हे रस्तयामधील झाडे काढून तत्काळ मार्ग मोकळा करणे आव्हानात्मक होते व तातडीने आवश्यक असलेल्या मदतकार्याची व्याप्ती पाहता मदतकार्यात गती येण्यासाठी व गावांमध्ये तातडीने मदत पोहोचविण्याच्या कामामध्ये समन्वय साधण्यासाठी दिघी सागरी पोलीस ठाणे आपली मोलाची भूमिका बजावत रस्ते दोन दिवसात मोकळे करण्यात मोलाचा वाटा उचलला.
Post a Comment