माणगाव : कोरोना संसर्गजन्य विषाणूपासून अजूनपर्यंत माणगाव तालुका सुरक्षित असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे कळकळीचे आवाहन माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, माणगावमधील एका खासगी रुग्णालयात महाड तालुक्यातील कोकरे गावांतील एका 65 वर्षीय व्यक्तीला पॅरालिसिसमुळे 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर 7 मे रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र त्यांना सुका खोकला, सर्दी अशी लक्षणे दिसत असल्याने त्यांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती.
रविवारी (10 मे) त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण माणगाव शहर अथवा तालुक्यात आढळून आलेला नाही. त्याचे मूळ गाव महाड तालुक्यातील कोकरे आहे. त्यामुळे माणगाव तालुका अजूनपर्यंत कोरोनापासून सुरक्षित आहे. येथे कोरोना रुग्ण आढळल्याची केवळ अफवा असून, या अफवांवर विश्वास ठेवू नका, तोंडाला मास्क लावा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.
आतापर्यंत ज्याप्रमाणे माणगाव तालुक्यातील जनतेने सरकार व प्रशासनाला चांगल्याप्रकारे सहकार्य केले असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी सतर्क रहा, जागरूक रहा. सरकार व प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Post a Comment