प्रवासी वाहतुकीने राज्य किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना वैयक्तिक वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही मात्र वैयक्तिक वाहनाने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक - जिल्हाधिकारी निधी चौधरी
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 03 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र आता लॉकडाऊन कालावधी दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.17 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या 1 मे 2020 च्या आदेशान्वये ज्या व्यक्तीला लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये प्रवास करावयाचा आहे,त्यांना नोंदणीकृत डॉक्टरांकडून करोना विषाणूची लक्षणे नसल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्य शासनाच्या 7 मे 2020 च्या आदेशान्वये ज्या व्यक्ती, मजूर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अडकून पडलेले आहेत व त्यांना त्यांच्या स्वगृही जाण्यासाठी प्रवास करावयाचा आहे, यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांकडून करोना विषाणूची लक्षणे नसल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना वगळण्यात आलेली आहे.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील जे नागरिक, मजूर लॉकडाऊनच्या काळात अडकून पडलेले आहेत व त्यांना प्रवासी वाहतुकीने इतर जिल्ह्यात व राज्याबाहेर प्रवास करावयाचा आहे, त्यांच्याकडून वैयक्तिक वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
प्रवाशांच्या प्रस्थानाच्या ठिकाणी राज्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांची एकत्रिरित्या शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून डिजिटल थर्मामीटर वापर करुन व लक्षणांवरुन वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. आवश्यकता असल्यास खाजगी नोंदणीकृत डॉक्टरांची मदत घ्यावी लागली तरी या तपासणीबाबत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
प्रवासाच्या प्रस्थानाच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे नाव,मोबाईल नंबर, पत्ता, जाण्याचे ठिकाण इत्यादीची एकत्रित यादी करुन द्यावी. नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी हे "या यादीमधील नमूद व्यक्तीला तपासले असून (influenza like illness(ILI) सारखी लक्षणे दिसत नसल्याचे" प्रमाणपत्र नोडल ऑफीसर यांना सादर करतील. या व्यतिरिक्त नागरिकांना वैयक्तिक वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
मात्र वैयक्तिकरित्या वाहनाने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व्यक्तीस वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील, असे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेशित केले आहे.
Post a Comment