वाटेतच बाप गमावला, मुंबईतून कोकणात निघालेल्या मुलांच्या डोळ्यासमोरच छत्र हरपलं!
कोरोनाची बाधा न होताही अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा लॉकडाऊन अनेकांसाठी एक भयावह स्वप्न ठरत आहे. शहरात राहून हाताला काम मिळत नसल्याने जीव जगावण्यासाठी लोकांनी गावचा रस्ता धरला आहे. मात्र अशातच रायगडमधून एक मन हेलावून टाकणार बातमी आली आहे.
मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रात्री ही दुर्दैवी घटना घडली. पेण तालुक्यातील जिते गावाजवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मोतीराम जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मोतिराम जाधव हे कुटुंबासह कांदिवली येथून श्रीवर्धन येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूनं गाठलं.
घराच्या ओढीने निघालेल्या चिमुकल्यांवर वाटेतच वडिलांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. लॉकडाऊनमुळे चालत निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची रायगडमधील ही तिसरी घटना आहे.
Post a Comment