मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
देशात कोरोनाचा फैलाव वाढत असून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाची व्याप्ती झपाट्याने वाढू लागली आहे.ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी आहे.महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे.आणि ग्रामीण भागातील अनेकजण नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून बाहेर आहेत.सहाजीकच अशांच्या कुटूंबियांची काळजी वाढली आहे.
नोकरी व्यवसायासाठी असलेले चाकरमानी तेथील गंभीर परीस्थितीमुळे आपल्या गावी परतत आहेत.त्यामुळे आता शहरातुन येणाऱ्या चाकरमान्यांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होउ नये यासाठी ग्रामपंचायतींनी देखील पुढाकार घेतला आहे.शासन व जिल्हा प्रशासन यंत्रणांकडून विविध उपाययोजना होत आहेत.मात्र नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही.शहरात गेलेले आता मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत आहेत परंतु गावात आल्यावर जबाबदारीचे भान बाळगुन स्वतःहुन होम क्वारंटाइन न होता तसेच प्रशासनाच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता ग्रामीण भागात टाळेबंदीत थोडी शिथिलता असल्याने आपल्याला काही होणार नाही,या अती आत्मविश्वासाने बाहेर विनाकारण फिरणारे,दारुबंदीला शिथिलता मिळाल्याने गच्ची,शेत शिवारात पार्ट्या करणाऱ्या अतीउत्साही व तेवढ्याच धोकादायक घटकांच्या संख्या काही कमी होत नाही.अशा बेजबाबदार लोकांमुळेच विषाणुंचा संसर्ग वाढण्याची,नवे वाहक तयार होण्याची भीती नाकारता येत नाही.काही खेडेगावात प्रशासनाच्या आदेशांची कडक अंमलबजावणी केली जाते.परंतु काही शहरवजा असणाऱ्या गावात अजुनही काही बेजबाबदार घटकांना या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येत नाही त्याचा फटका आजपर्यंत प्रशासनातील सर्व घटकांनी केलेल्या चोख नियोजनामुळे कोरोनामुक्त असलेल्या स्थानीक गावकऱ्यांना नाहक सहन करावा लागणार आहे.कोकणच्या रम्य भुमीवर कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटाचे आलेले मळभ दुर करण्यासाठी या लढाईत प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.त्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या मुंबईकरांनी निदान १४ दिवस तरी घराबाहेर पडू नयेत. घरोघरी जाणाऱ्या आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांना नागरिकांनी परिपूर्ण माहिती द्यावी.कोणतीही माहिती लपवू नये.शहरातुन आलेले कोणी बाहेर पडलेच तर त्याबाबत जबाबदार व्यक्तिंकडुन प्रशासनाला तातडीने माहिती मिळावी म्हणून ग्रामपंचायतींनी विविध समाजातील व्यक्तिंना एकत्र करुन ग्राम सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत व त्यांच्यामार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची व सामाजिक अंतर पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी,तालुका स्तरावर तहसीलदार कोरोनाशी संबंधित सर्व अधिकार घेऊन कार्यरत आहेत.मात्र गावपातळीवर त्यांनी ही जबाबदारी सरपंचाकडे दिली आहे.परंतु सरपंच हा कुठल्यातरी एका राजकीय पक्षाचा असतो,एखाद्या गटाचा असतो.अशावेळी ही परिस्थिती हाताळण्यास अडचणीचे ठरते.आपल्या गावामध्ये मुंबई पुण्यासारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरातुन असे चाकरमानी येऊन राहिले असतील तर त्याची माहिती देऊन पुढील कार्यवाही करणे प्रत्येक सरपंचाला जमेलच असे नाही.कारण त्यातून वाद होऊ शकतात.अशावेळी प्रशासनाचाच माणूस हे काम करण्यासाठी शासनाने नेमायला हवा.किंवा इतर कर्मचार्याकडे ही जबाबदारी द्यायला हवी असे मत काही सरपंच खाजगीमध्ये व्यक्त करीत आहेत.यदा कदाचित मुंबई पुण्याहुन आलेल्या लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे गावाकडे जर हा आजार बळावला तर तो रोखण्यासाठी गावामध्ये पर्याप्त आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का ? किंवा सर्व ग्रामीण भागामध्ये हा आजार शहरासारखा मर्यादित करणे सरकारला तरी शक्य आहे का ? शहरातुन गावात आलेल्यांनी याचा गांभीर्याने विचार करुन व सर्वांनी शासनाच्या नियमांचे कसोशीने पालन करुन आपली,आपल्या कुटुंबाची व त्याचबरोबर आपल्या गावाची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाने पाळली तर आणि तरच आपली गावे आपण सुरक्षित ठेऊ व कोकणच्या या रम्य भुमीवर कोरोनारुपी संकटाचे दाटुन आलेले मळभ दुर होउन कोरोनामुक्त निरभ्र आकाशाखाली आपण पुन्हा मोकळा श्वास घेऊ.
Post a Comment