(म्हसळा प्रतिनिधी)
दरवर्षी १ मे रोजी विद्यार्थ्यांना प्रगतीपत्रक दिले जाते. मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांना गुणाऐवजी 'ग्रेड' दिले जातात. यातून वर्षभरातील विद्यार्थ्यांची प्रगती लक्षात येते. पालकांना देखील मुलांच्या प्रगतीचा अंदाज याच दिवशी येत असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या गतीने मुलांची प्रगती पालकांना कळू शकली नाही. कोरोनाने चिमुकल्यांचा निकालाचा आनंदच हिरावून घेतला. निकालाचा आनंदाचा १मे हा दिवस पहिल्यांदा सुनासुना झाला, तर शाळाही ओस पडल्याचे भयानक दृश्य दिसत आहे.शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून शाळेच्या पहिल्या दिवसांपासून विद्यार्थ्यांत गुणवत्तेची स्पर्धा सुरु होते. शाळा, शिक्षक अन् पालक या स्पर्धेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होतात. त्यासाठी शाळेसह वर्षभर विविध शिकवण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याना घडविण्याचे काम सुरू असते.वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात. आपला मुलगा, आपलीच शाळा पहिली अशी शैक्षणिक स्पर्धा वर्षभर सुरू असते. मात्र यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या शेवटी परिक्षेच्या दिवसांत कोराना विषाणूने मानवजातीचीच परिक्षा सुरु केली. त्यामुळे अनेक वर्गाच्या वार्षीक परिक्षाच रद्द झाल्या. परिक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्याना निकालाची ओढ असते.ती विद्यार्थ्यांची इच्छा लौकरच पूर्ण होणार आहे.नुकतेच १ली ते ८ वी व ९वी व ११वीचा निकालाबाबत स्पष्ट आदेश शिक्षण संचालकानी सर्व जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाना दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२०चा निकाल विद्यार्थ्यांच्या वार्षिक मूल्यमापनाचे अधारे होणार आहे व तो निकाल दूरध्वनी, SMS, किंवा ऑन लाईन पध्दतीने कळविण्यात येणार आहे. स्थानिक लॉक डाऊन परिस्थीती नुसार पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी निकाल पत्र देण्याची आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी शाळा- महाविद्यालयाचे व्यवस्थापन करणार आहे.
"म्हसळा तालुक्यात ११ केंद्राअर्तगत जि.प. च्या १०२ शाळांमधून १ ली ते ८वी चे ३०३६ व ५वी ते ८वी २८६० असे ५८९६ विद्यार्थी आहेत तालुक्यातील सर्व शाळांचा निकाल १३ मे पूर्वी लागणार"
संतोष शेडगे, गट शिक्षण अधिकारी म्हसळा
Post a Comment