रायगड : प्रतिनिधि म्हसळा लाईव
रायगड जिल्ह्यातील स्वॅब टेस्टींग लॅब सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, लवकरच ही लॅब अलिबागमध्ये सुरु होईल. करोनाची लक्षणे दिसून येणार्या व दारिद्रयरेषेखाली असणार्या लोकांची स्वॅब टेस्ट करण्यासाठी होणारा खर्च जिल्हा नियोजन निधीमधून करण्यात येईल अशी माहीती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार रवि पाटील, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. अनिकेत तटकरे, आ. बाळाराम पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मेट्रोपोलिस लॅब यांच्याशी समन्वय साधल्यानंतर त्या लॅबने जिल्ह्यातील 10 हजार लोकांचे स्वॅब टेस्टींग मोफत करुन देण्यात येईल, असे निश्चित झाल्याने त्याबद्दल आयुक्त सुधाकर देशमुख आणि मेट्रोपोलिस लॅबचे या बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींकडून विशेष अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्यासह उपस्थिती लोकप्रतिनिधींनी कोविड उपचार केंद्रामधील आरोग्य कर्मचार्यांची व्यवस्थित काळजी घेतली जावी, त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा दिल्या जाव्यात, सर्व विभागांच्या अधिकार्यांनी आपआपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून लोकोपयोगी कामांना तातडीने सुरुवात करावी, आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालये अधिग्रहित करावीत, पुढील परिस्थितीचा विचार करुन आवश्यक उपाययोजना आताच करुन ठेवाव्यात, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई व जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून करानो बाधित रुग्णांकरिता करण्यात येणार्या उपाययोजना संदर्भात, उपलब्ध साधन सामुग्रीबाबत, आरोग्य विषयक काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांविषयी माहिती दिली.
Post a Comment