मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये टाळेबंदी व संचारबंदी लागु आहे टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल सुरू झाले.उधारीचं जगणं आणखीनच महाग झालं.हाती असणार काम बंद झालं तर खर्चही बंद होतो असं नाही.खर्च सुरुच राहतो.घरभाडे,रेशन,वैद्यकीय आणि अन्य अनेक आवश्यक गोष्टी पैशांशिवाय मिळत नाहीत.त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या अनेकांचे हाल सुरू झाले.या लोकांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.मात्र टाळेबंदी वाढत असल्याने या मजुरांचे मन थाऱ्यावर रहात नव्हते.अनेकांनी पायीच घराची वाट धरली.काही भागातील मजुरांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करण्याची जीवघेणी धडपड सुरु केली.त्यामुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी रेल्वे,बस काही प्रमाणात सुरु केल्या.त्याच पार्श्वभूमीवर श्रीवर्धन प्रांताधिकारी श्री.अमित शेडगे,तहसिलदार श्री.सचिन गोसावी श्रीवर्धन बस आगाराच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्लीपंचतन मंडळ अधिकारी सुनील मोरे यांनी योग्य नियोजन करुन बोर्लीपंचतन येथुन बुधवार दि.१३मे रोजी सायंकाळी ५ वा.सुमारास कर्नाटक राज्यातील मजूरांना घेऊन तीन एस टी बसेस कर्नाटक सीमेवरील जत या ठिकाणी रवाना केल्या.श्रीवर्धन आगारातून एकूण तीन बसेस निघाल्या असून प्रत्येक गाडीत २२ याप्रमाणे एकूण ६६ प्रवासी कर्नाटक सीमेच्या दिशेने जाणार आहेत.प्रवासासाठी एकूण प्रासंगिक कराराच्या दृष्टीने प्रवासी भाडे आकारले जाणार आहे.प्रत्येक गाडीत सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून एका आसनावर प्रत्येकी एका व्यक्तीलाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.एस.टी.बस डेपोमधून मार्गस्थ होण्यापूर्वी सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखल्याच्या आधारे त्यांना प्रवासासाठी प्रमाणित करण्यात आले.त्याचसोबत या तीनही एसटी बसेस आगारातून सुटण्याअगोदर सॅनिटायझरने निर्जंतूक करण्यात आल्या असल्याचे बोर्लीपंचतन स्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री.प्रसाद मोरे यांनी सांगितले.हे सर्व प्रवासी बोर्लीपंचतन परीसरात प्रामुख्याने दगडखाणीवर काम करणारे मजूर असून प्रवासादरम्यान या मजूरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील महसुल प्रशासनाकडून करण्यात आली आहे.एस.टी.महामंडळाने आखून दिलेल्या मार्गानेच तसेच वाटेत फक्त नैसर्गिक विधीसाठी प्रसाधनगृहाव्यतिरीक्त अन्य कुठेही न थांबता थेट कर्नाटक सीमेवरील जत या ठिकाणीच बसेस जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत जाणार आहेत.तिथून पुढचा प्रवास मजुरांनी संबंधित राज्याच्या परवानगीने आणि मदतीने करायचा आहे.त्याबाबत संबंधित प्रशासनाशी समन्वय राखला गेला आहे.लाल परीमधून जाताना मजुरांनी प्रशासनाचे आभार मानत आपल्या गावी कुटुंबामध्ये जाणार म्हणुन आनंद व्यक्त केला.यावेळी मंडळ अधिकारी श्री.सुनील मोरे,तलाठी निलेश पवार,सुनील भगत,संदीप सोरे,मिलिंद पुट्टेवाड कोतवाल गणेश महाडीक तसेच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते वैभव खोत उपस्थित होते.
Post a Comment